इस्लामिक देश पुरवतात 'हमास'ला पैसा
पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास (Hamas)आणि इस्राएल (Israel)यांच्यात युद्ध (war) चालू आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी सकाळी इस्राएलच्या दिशेने सुमारे ५ हजार रॉकेट सोडले. यानंतर इस्राएलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली. हमाससारखी एखादी दहशतवादी संघटना इस्राएलसारख्या बलाढ्य देशाशी कशी स्पर्धा करू शकते, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र जगभरातील इस्लामिक देश हमास आणि अन्य दहशतवादी संघटनांना पैसा पुरवत असतात. हमासला अनेक देशांकडून आर्थिक मदत मिळत असली तरी त्याला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या यादीत इराण आणि तुर्कस्तानचे नाव अग्रस्थानी आहे. (Israel-Hamas War)
इस्राएलने हल्ले सुरू केल्यापासून गाझा पट्टीतील दहा लाखांहून अधिक जणांना आपले घर सोडून निघून जावे लागले आहे. इस्राएलने गाझा पट्टीचा वीज, पाणी आणि इंधन यांचा पुरवठा थांबवला असून युद्धामुळे अन्नाचाही तुटवडा आहे. त्यामुळे स्थलांतरितांना पाण्याची आणि अन्नाची प्रचंड कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर हमास संघटना माघार घेईल, असे वाटत असतानाच हमासनेही जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. कारण हमासकडे पैसा, शस्त्रास्त्रे यांची कमतरता नाही. इस्राएलशी वैर असलेली हमास ही पॅलेस्टाईनची इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. शेख अहमद यासीन यांनी १९८७ च्या जनआंदोलनात या संघटनेची पायाभरणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत हमास इस्राएलला पॅलेस्टिनी भागातून हटवण्यासाठी झगडत आहे. गाझा पट्टीतून काम करणाऱ्या हमासला इस्राएल हा देश म्हणून मान्य नाही.
इराण दीर्घकाळापासून हमासला आर्थिक ताकद आणि लष्करी शस्त्रे पुरवून पाठिंबा देत आहे. या शस्त्रांमध्ये प्राणघातक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. अहवालानुसार, हमासला आखाती आणि काही पाश्चात्य देशांकडून पैसे मिळतात. परदेशातून येणारा पैसा पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणांद्वारे हमासला दिला जातो, हमासचे गाझा पट्टीवर संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आहे. याशिवाय गुप्त मार्ग आणि बोगद्यांद्वारे आणल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या करातूनही हमासला मोठा निधी मिळतो. अहवालानुसार या कराच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपये दिले जातात. इराण आणि तुर्कस्तान व्यतिरिक्त सीरियादेखील हमासचा समर्थक आहे आणि त्याला मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटनसारख्या देशांनी हमासला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हमासने वाढते आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यासाठी क्रिप्टोकरन्सी, क्रेडिट कार्ड्सचा वापर करून आर्थिक मदत मिळवली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इस्राएल सरकारला आपल्या तपासात हमासला निधी पुरवण्यात क्रिप्टोकरन्सीची महत्त्वाची भूमिका असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर इस्राएलने आता हमासची क्रिप्टो खाती जप्त केली आहेत. अहवालानुसार, अतिरेकी संघटना हमासने मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवून या हल्ल्यासाठी निधी गोळा केला होता. इस्राएलने हमासची सर्व क्रिप्टो खाती गोठवली आहेत.