संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन/तेहरान: इराणमध्ये हमासचे राजकीय प्रमुख इस्माइल हानिया यांच्या हत्येनंतर मध्यपूर्वेतील तणाव टोकाला पोहोचला असून इराण केव्हाही इस्राएलवर हल्ला करू शकतो. अशा स्थितीत इस्राएलला मदत करण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल कमांड फोर्सचे प्रमुख जनरल मायकेल कुरेला तेल अविवमध्ये पोहोचले आहेत. कुरेला यांनी तेल अविवमध्ये इस्राएलच्या संरक्षण दलाचे कोहिवा यांच्याशी हवाई संरक्षणाबाबत चर्चा केली.
दुसरीकडे इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात जोरदार वादावादी झाली असल्याचे कळते. चर्चेवेळी बायडेन हे नेतन्याहू यांना म्हणाले की, माझ्याशी वायफळ बोलू नका. बायडेन यांनी हानियाच्या हत्या आताच घडविल्याने युद्धबंदीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट केले. नेतन्याहू यांनी बायडेन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. हानियाच्या हत्येबाबत इस्राएलने अमेरिकेला काहीही कल्पना दिली नव्हती. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने शनिवारी असे स्पष्ट केले की, हमास प्रमुख हानिया हे अत्यंत जवळून केलेल्या क्षेपणास्त्र माऱ्यात मारले गेले. हे क्षेपणास्त्र ७ किलो स्फोटकांनी भरलेले होते.
क्षेपणास्त्र हल्ला इस्राएलने केल्याचे इराणने म्हटले होते आणि त्याला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. हानिया राहात असलेल्या गेस्ट हाऊसच्या बाहेरून हा हल्ला झाला होता. हमासचे प्रवक्ते अल-हय्या यांनीही तेहरानमध्ये हानिया राहात असलेल्या घराला थेट रॉकेटने लक्ष्य केल्याचा दावा केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार हानिया बॉम्बस्फोटात मारला गेला. इराणच्या गेस्ट हाऊसमध्ये २ ते ३ महिने अगोदर हा बॉम्ब बसवण्यात आला होता. यामध्ये इराणच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचाही हात होता. या प्रकरणी इराणने आतापर्यंत २४ जणांना अटक केली आहे. हानियाच्या हत्येचा बदला घेतला जाईल, याचा पुनरुच्चार इराणने केला आहे.
आम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असेही त्यांनी म्हटले आहे. इस्राएलने अद्याप या प्रकरणी मौन बाळगले आहे. इराणमधील हल्ल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. इराणच्या हल्ल्याच्या भीतीने अमेरिकेने मध्यपूर्वेत युद्धनौका आणि लढाऊ विमानांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोसादला हानियाची हत्या करावयाची होती. मात्र, त्यावेळी प्रचंड गर्दी असल्याने योजना फसली असती, म्हणून ती लांबणीवर ढकलली. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्लाहने इस्राएलचा बदला घेण्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले की, सध्या इस्राएली खूप आनंदात असले तरी येत्या काही दिवसांत ते खूप रडतील. इस्राएलने धोक्याची रेषा ओलांडली आहे. नसरुल्लाहच्या धमकीनंतर काही तासांनी हिजबुल्लाहने इस्राएलवर हवाई हल्ला केला होता. हिजबुल्लाहने लेबनॉनमधून उत्तर इस्राएलवर डझनभर रॉकेट डागले.