संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना पक्ष आणि उदारमतवादी गटाकडून सर्वाधिक देणग्या मिळत आहेत. कमला यांना डेमोक्रॅट्स आणि उदारमतवादींनी एकूण ४ हजार ४५३ कोटींची देणगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाकडून केवळ ३५५ कोटी रुपयेच देणगी म्हणून मिळाले आहेत. मजेशीर बाब म्हणजे बायडेन हे शर्यतीत असताना डेमोक्रॅट्सनी २ हजार कोटींची देणगी दिली होती. १३ दिवसांतच कमला यांनी २ हजार ४०० कोटींहून अधिक पैसे गोळा केले आहेत. दुसऱ्या बाजूला ट्रम्प याच १३ दिवसांत रिपब्लिकन पक्षाकडून ५५ कोटी रुपयेच मिळवू शकले. दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांना गुंतवणूक आणि सिक्युरिटीज क्षेत्रातील कंपन्यांनी मोठा हात दिला असून कमल हॅरिस यांच्या पाचपट अधिक देणग्या या वर्गाने ट्रम्प यांना दिल्या आहेत.
अमेरिकेत क्रिप्टो करन्सीला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन ट्रम्प देत आहेत. या अजेंड्यावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे ट्रम्प यांच्या बाजूने निधी गोळा करत आहेत. ट्रम्प यांना आता जेपी मॉर्गन, ब्लॅक स्टोनच्या स्टीव्ह स्कव्हर्जमॅनकडून गेल्या आठवड्यात २०० कोटींहून अधिक देणगी मिळाली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प हे गुंतवणूक आणि सिक्युरिटीज क्षेत्रातील कंपन्यांची पहिली पसंती बनले आहेत. या क्षेत्राकडून डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत ९५५ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना गुंतवणूक कंपन्यांकडून आतापर्यंत केवळ १६३ कोटी रुपये देणगी म्हणून मिळाले आहेत. ट्रम्प यांना या क्षेत्राकडून पाचपट अधिक देणगी मिळाली आहे.
पक्षांना देणगी देण्याबाबतीत सेवानिवृत्त लोकांनीही डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केली आहे. निवृत्त लोकांकडून ट्रम्प यांना ७७५ कोटी रुपये मिळाले आहेत, तर कमला हॅरिस यांना १८३ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. याचे मोठे कारण म्हणजे निवृत्त लोकांचा ट्रम्प यांच्या उजव्या राष्ट्रवादी धोरणांना पाठिंबा आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निवृत्ती लाभ करकपातीच्या निर्णयाचे मोठे समर्थक म्हणून हे लोक समोर आले आहेत. अमेरिकेतील नोकरदार लोकांकडून कमला यांना ३४ कोटी रुपये, तर याच वर्गाकडून ट्रम्प यांना १८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. याचे कारण कमला हॅरिस यांनी मध्यमवर्गाला करामध्ये सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे.