संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : मूळचे आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यातील भारतीय वंशाचे ६३ वर्षीय डॉक्टर रमेश बाबू पेरामशेट्टी यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या केली आहे. रमेश बाबू हे अमेरिकेतील एक नावाजलेले डॉक्टर होते.
शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी ॲलाबामामधील टस्कलोसा भागात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांत असणाऱ्या रुग्णालयांचं व्यवस्थापन ते पाहात होते. डॉक्टर रमेश बाबू पेरामशेट्टी हे क्रिम्सन नेटवर्कसाठी काम करणाऱ्या स्थानिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे संस्थापक सदस्य आणि वैद्यकीय संचालक होते. क्रिम्सन ग्रुप हा अमेरिकेत विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे व्यवस्थापन करतो. रमेश बाबू पेरामशेट्टी यांच्या निधनानंतर क्रिम्सन ग्रुपकडून सोशल मीडियावर निवेदन जारी करण्यात आले असून त्यामध्ये पेरामशेट्टी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
डॉ. रमेश बाबू पेरामशेट्टी यांच्या हत्येबाबतचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्यांच्या हत्येची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. हत्येमागील नेमक्या कारणांचा प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.
कोण आहेत पेरामशेट्टी?
रमेश बाबू पेरामशेट्टी यांना ३८ वर्षांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे. ते टस्कलोसा भागात काम करत होते. काहींच्या मते टस्कलोसामधील काही भागाला त्यांचं नावही देण्यात आलं होते. पेरामशेट्टी यांनी कोविडच्या काळातही मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा केली होती. त्यांना त्यासाठी पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे कुटुंबीय अमेरिकेतच वास्तव्यास आहे.