संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: अमेरिकन पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी एका ४० वर्षांच्या भारतीय डॉक्टरला अटक केली आहे. अटक केलेल्या भारतीय डॉक्टरचे नाव ओमेर एजाज असे आहे. ओमेर एजाजवर लहान मुले आणि महिलांचे नग्न व्हीडीओ बनवल्याचा आरोप आहे. दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांचे आणि महिलांचे शेकडो नग्न फोटो आणि व्हीडीओ रेकॉर्ड केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
ओमेर एजाज याचा हा उद्योग दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वत:च्या बायकोने उघडकीस आणले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने बाथरूम, चेंजिंग एरिया, हॉस्पिटल रूम आणि अगदी घरात देखील छुपे कॅमेरे लावले होते. आरोपी डॉक्टर बेशुद्धावस्थेत किंवा झोपलेल्या अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवत होता, असा खुलासा करण्यात आला आहे. त्याच्या पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय बळावल्याने पत्नीने तपास सुरू केला. त्यावेळी पत्नीच्या हाती एक हार्ड ड्राईव्ह सापडली. पत्नीने हार्ड ड्राईव्ह चेक केल्यानंतर तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आपला पती अश्लील कृत्य करत असल्याचे लक्षात येताच तिने धाडसी निर्णय घेतला अन् थेट पोलिसांना कळवले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली अन् आरोपी डॉक्टरला अटक केली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी डॉक्टरचे हे कृत्य सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अत्याचार इतका व्यापक आहे आणि विकृती खूप मोठी आहे. आम्ही आणखी खोलात जाऊन तपास करत असून तातडीने कारवाई केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. हा आरोपी डॉक्टर २०११ मध्ये भारतातून कामासाठीचा व्हिसा घेऊन अमेरिकेत गेला होता. त्यानंतर त्याने नागरिकत्व मिळवले.
कोण आहे ओमेर एजाज?
डॉ. ओमेर एजाज हा मेडिसीनचा डॉक्टर आहे. २०११ मध्ये तो अमेरिकेत गेला होता. त्याने निवासी डॉक्टर म्हणून सीनाय ग्रेस रुग्णालयात त्याची इंटर्नशीप पूर्ण केली. त्यानंतर हा डॉक्टर अलाबामा येथील डाऊसन या ठिकाणी काही वर्षे राहिला. तिथून तो मिशिगन या ठिकाणी आला आणि त्याची प्रॅक्टीस करत होता. त्याने आत्तापर्यंत विविध रुग्णालयांमध्ये औषधांमधला तज्ज्ञ डॉक्टर म्हणून काम केले आहे. त्यामुळे या डॉक्टरच्या घरी छापा मारण्यात आला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ओमेर एजाजच्या नावे याआधी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. १३ ऑगस्ट रोजी त्याच्यावर एका महिलेचा न्यूड व्हीडीओ काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण उघडकीस आले. मागच्या सहा वर्षांमध्ये या डॉक्टरने सुमारे १३ हजार व्हीडीओ तयार केले आहेत. या महिला आणि मुली अज्ञात आहेत. मात्र डॉ. एजाजचे हे कृत्य विकृतीचा कळस गाठणारे आहे, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे. आम्हाला जे समजले आहे त्यावरून असा अंदाज आहे की हिमनगाचे एक टोक फक्त हाती लागले आहे. त्याने काय काय व्हीडीओ रेकॉर्ड केले आहेत हे जाणून घेण्यासाठी बहुदा काही महिने जातील, अशी माहिती ऑकलंड काऊंटीचे शेरीफ माईक बुचर्ड यांनी दिली आहे.