संग्रहित छायाचित्र
मॉस्को: रशियाचा ३२८ वा नौदल दिन रविवारी साजरा झाला. यात भारतीय नौसैनिक सहभागी झाले होते. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय नौसैनिकांची मानवंदना स्वीकारली. भारताची युद्धनौका आयएनएस तबरने नौदल दिनाच्या संचलनात भाग घेतला.
पुतिन यांनी भारतीय नौसैनिकांना अभिवादन केले आणि नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले. कॅप्टन एमआर हरीश आयएनएस तबर या युद्धनौकेचे नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत या युद्धनौकेवर २८० कर्मचारी आहेत. सेंट पीटर्सबर्ग येथे साजरा होत असलेल्या नौदल दिनात सुमारे २०० जहाजांनी भाग घेतला. तसेच १५ हजारांहून अधिक सैनिकही उपस्थित होते. परेड संपल्यानंतर सेंट पीटर्सबर्ग आणि रशियन नौदल तळावर संगीत मैफली, आर्मी बँड आणि आतशबाजीचे कार्यक्रम झाले. र
शियाला पोहोचण्यापूर्वी आयएनएस तबर १७ जुलैला जर्मनीला पोहोचली. जिथे हॅम्बुर्ग बंदरात ३ दिवस मुक्काम केला. तेथे भारतीय नौसैनिकांची जर्मन नौदलासोबत अधिकृत बैठक झाली. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही भारतीय युद्धनौका पाहण्याची संधी देण्यात आली. आयएनएस तबर ही प्रगत तलवार श्रेणीची युद्धनौका आहे. १९९७ मध्ये रशियाकडून खरेदी केलेल्या क्रिवाक-तीन युद्धनौकेतून भारताने हे जहाज विकसित केले आहे. त्याची रचना बाल्टिक शिपयार्डने केली होती. २००४ मध्ये ते भारतीय नौदलात दाखल झाले. तबर ही जहाजे, पाणबुड्या आणि हवाई लक्ष्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज केली आहे.