संग्रहित छायाचित्र
अण्वस्त्रांच्या संख्येबाबत भारताने पाकिस्तानला मागे टाकलं असून स्वीडिश थिंक-टँकच्या अहवालानुसार जानेवारी २०२४ पर्यंत भारताकडे १७२ अण्वस्त्रे होती. याचवेळी पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे होती. (Nuclear Weapons)
या अहवालातील दाव्यानुसार भारताने २०२३ मध्ये नव्या अण्वस्त्रांची निर्मिती करून अण्वस्त्रांची संख्या वाढवली आहे. दुसऱ्या बाजूला चीननेही त्यांच्या अणू कार्यक्रमात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०२४ पर्यंत त्यांच्याकडे ५०० अण्वस्त्र होती. तसेच चीनने पहिल्यांदाच त्यांची हाय ऑपरेशनल शस्त्रे अलर्ट मोडवर ठेवली आहेत. जानेवारी २०२३ पर्यंत चीनकडे ४१० आण्विक शस्त्रं होती, जी आता ९० ने वाढली आहेत.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिट्यूटच्या (Stockholm International Peace Research Institute) अहवालानुसार भारत, चीन, पाकिस्तानसह जगभरातील एकूण नऊ देशांकडे आण्विक शस्त्रं आहेत. अण्वस्त्रधारी देशांचं अण्वस्त्रांवरील अवलंबित्व वाढत चालले आहे. अहवालात म्हटलं आहे की, ज्या ज्या देशांकडे अण्वस्त्रं आहेत ते देश त्यांच्याकडील आण्विक शस्त्रं अत्याधुनिक करत आहेत. अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या देशांमधील सरकारे यावर अधिक लक्ष देत आहेत. भारत, चीन, पाकिस्तान, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, उत्तर कोरिया आणि इस्राएल या देशांकडे अण्वस्त्रं आहेत.
जगभरात जितकी अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी ९० टक्के केवळ अमेरिका, रशियाकडे आहेत. उर्वरित १० टक्के अण्वस्त्रे इतर सात देशांकडे आहेत. २०२३ मध्ये अनेक देशांनी आण्विक सक्षम शस्त्रे तैनात केली आहेत. जगभरात तयार केलेल्या १२,१२१ अण्वस्त्रांपैकी जवळजवळ ९,५८५ अण्वस्त्र संभाव्य वापरासाठी सैन्याच्या शस्त्रागारात ठेवली आहेत.
या अहवालानुसार, चीन हा देश वेगाने त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण करत आहे. चीनने अधिकाधिक अण्वस्त्रांची निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ९० नवी आण्विक शस्त्रे तयार केली आहेत. या दशकाच्या अखेरपर्यंत त्यांना रशिया आणि अमेरिकेची बरोबरी करायची असल्याचे सांगितलं जात आहे. सध्याच्या घडीला रशिया आणि अमेरिकेकडे चीनच्या अनेक पटींनी अधिक आण्विक शस्त्रे आहेत. अमेरिकेकडे चीनच्या सात पट तर रशियाकडे आठ पट अधिक आण्विक शस्त्रे आहेत. चीन एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत मारा करता येईल अशी बॅलेस्टिक क्षेपणास्रे तयार करत आहे. वृत्तसंंस्था
जगातील अण्वस्त्रे
देश (अण्वस्त्रांची संख्या)
रशिया (४,३८०)
अमेरिका (३,७६०)
चीन (५००)
फ्रान्स (२९०)
ब्रिटन (२२५)
भारत (१७२)
पाकिस्तान (१७०)
इस्राएल (९०)
उत्तर कोरिया (५०)