भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही इतरांना पैसे मागतोय...
इस्लामाबाद, भारत चंद्रावर पोहोचला आहे. आपल्या देशावर मात्र इतरांना पैसे मागण्याची वेळ आली आहे. अंतर्गत घटकांच्या उपद्व्यापामुळे जगात आपल्या देशाची प्रतिष्ठा खालावली आहे, असा घरचा आहेर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंगळवारी (दि. १९) दिला.
भारताचे कौतुक करताना शरीफ म्हणाले, ‘‘आपला शेजारी देश जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन करत आहे. आज भारताकडे ६००अब्ज डॉलर्सचा खजिना आहे. त्याचवेळी पाकिस्तान, चीन आणि अरब देशांसह जगभरातून एकेक अब्ज डॉलर्सची मागणी करत आहे. अशा स्थितीत त्यांच्यासमोर आपली काय इज्जत राहिली? आपण कंगाल होण्याच्या मार्गावर आहोत.’’
ज्यांनी पाकिस्तानची ही अवस्था केली ते देशाचे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) सरकारने देशाला डिफॉल्ट होण्यापासून वाचवले आहे, अन्यथा देशात पेट्रोलची किंमत १,००० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली असती, असा दावादेखील नवाज शरीफ यांनी केला.
माझ्या राजवटीत देशाची प्रगती होत होती. असे असतानाही मला कोर्टात २७ वर्षांची शिक्षा झाली. मला वर्षानुवर्षे देशाबाहेर राहावे लागले. या सगळ्यामागे जनरल बाजवा आणि जनरल फैज यांचा हात होता. १९९० मध्ये भारताने आम्हाला पाहून आर्थिक सुधारणा आदेश लागू केला. त्यांचा देश आज कुठे पोहोचला आहे ते पाहा. वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या देशाकडे एक अब्ज डॉलर्सही नव्हते आणि आज ६०० अब्ज डॉलर्स आहेत, अशी तुलनादेखील शरीफ यांनी यावेळी केली. दरम्यान, पीएमएल-एन पक्षाचे उपाध्यक्ष हमजा शाहबाज म्हणाले, ‘‘नवाज यांनी पाकिस्तानला अणुशक्ती राष्ट्र बनवले होते, पण आजघडीला आपण भिकारी देश बनलो आहोत. हे खूप लाजीरवाणे आहे. आता पाकिस्तानची जनता नवाज शरीफ यांना पंतप्रधान करून देशाचे भविष्य सुरक्षित करेल.’’
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांनी सुमारे आठवडाभरापूर्वी जाहीर केले होते की, नवाज २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानात परतणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानातही जय्यत तयारी सुरू झाली आहे. लंडनमध्ये पीएमएल-एनच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
लष्कर, आयएसआय, न्यायव्यवस्था यांच्यामुळे देश भिकेला लागला...
नवाज शरीफ यांनी देशाच्या स्थितीसाठी निवृत्त लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद आणि माजी सरन्यायाधीश मियाँ साकिब निसार यांना या सर्वासाठी जबाबदार धरले. लष्कर, आयएसआय आणि न्यायव्यवस्था यांच्यामुळे आपला सुंदर देश भिकेला लागला असल्याची थेट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘‘आज देशातील गरीब लोक भाकरीसाठी तळमळत आहेत. देशाची ही स्थिती कोणी आणली आहे? २०१७ मध्ये पाकिस्तानात हे दृश्य नव्हते. त्या काळी मैदा, तूप, साखर हे सर्व स्वस्तात मिळायचे. विजेची बिले लोकांच्या खिशानुसार यायची. आज लोकांना ३० हजार रुपयांपर्यंत वीज बिल येते. अशा स्थितीत मुलांचे पोट भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत,’’ याकडे शरीफ यांनी लक्ष वेधले.