संग्रहित छायाचित्र
डबलिन: पती आणि पत्नी यांच्यात अचानक विमानात भांडण सुरू झाले. हे भांडण इतके वाढले की विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली. अलीकडेच घडलेल्या या घटनेत डबलिन येथून टेकऑफ घेतलेल्या विमानात नवरा आणि बायकोचे भांडण सुरू झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की विमानाला रिटर्न यावे लागले. याचा फटका त्या संबंधित कुटुंबासह विमानातील अन्य प्रवाशांनाही बसला.
पती आणि पत्नी यांचे नाते वेगळेच असते. संसार म्हटला की भांड्याला भांडे लागतेच, असेही म्हटले जाते. पती आणि पत्नी चारचौघात आपले नाते किती चांगले आहे हे भासवत असले तरी काही ना काही कुरबुरी आणि आदळआपट घरोघरी सुरूच असते. अनेक जोडपी भररस्त्यात भांडताना दिसतात. काल परवा उत्तर प्रदेशातील व्हायरल झालेल्या एका व्हीडीओ तर पत्नीने पतीची कॉलर पकडून त्याच्या कानाखाली लगावल्याच्या व्हीडीओने सोशल मीडियावर हंगामा झाला होता. बाहेर नवरे फुशारक्या मारीत असले तरी घरी आल्यावर बायकांसमोर त्यांचे काही चालत नाही. अगदी वाघाचे मांजर झालेले असते. असाच एक मेलोड्रामा विमान उडत असताना घडला आहे.
डबलिनहून फ्लाईट ईआय ७३८ ने सोमवारी (२९ जुलै) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास उड्डाण केले. एक तासानंतर क्रूजडून इमर्जन्सीची लँडिंगची घोषणा करण्यात आली. कारण या जोडप्याची हाणामारी इतकी मोठी झाली की त्यांना शांत करण्याचे क्रूचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. दोघेही एकमेकांना लाथा-बुक्क्या घालू लागले, इथपर्यंत ही मारामारी झाली. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच विमानाने कंट्रोल रूमला माहिती दिली. नाईलाजाने अखेर नॅनटेस एअरपोर्टवर या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
अखेर दोन तासांच्या विलंबाने उड्डाण
या नवरा–बायकोच्या भांडणात या नवऱ्याने बायकोला चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिचे प्राण वाचवण्यासाठी विमानाची इमर्जन्सी लँडिंग झाली. या नवरोबाला पोलिसांनी लागलीच अटक केली. अखेर दोन तासांच्या विलंबानंतर हे विमानाने पुन्हा उड्डाण घेतले आणि ते आपल्या गंतव्य स्थानी म्हणजे पाल्मा डी मलोरका एअरपोर्टवर पोहचले. विमानातील प्रवाशांनी या प्रकारानंतर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या अशा प्रकाराचा इतरांना नाहक त्रास झाल्याने ते नाराज झाले. सोशल मीडियावर देखील अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.