संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: निवडणूक जिंकण्यासाठी विरोधक वाट्टेल ते दावे करत असल्याचा दावा करत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारतीय वंशाच्या अशी ओळख सांगणाऱ्या हॅरिस आता त्या कृष्णवर्णीय असल्याचे सांगत सुटल्या आहेत. त्या अचानकपणे कृष्णवर्णीय बनल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिकागो येथे नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नालिस्ट्सच्या एका अधिवेशनात बोलताना त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका केली. कमला हॅरिस या काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय वंशाच्या होत्या. मात्र, आता त्या अचानक कृष्णवर्णीय झाल्या आहेत, अशी खोचक टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
कमला हॅरिस यांनीही दिले प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर आता कमला हॅरिस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा-पुन्हा त्याच पद्धतीची टीका करत आहेत. समोरच्या उमेदवाराचा अपमान करणे ही त्यांची जुनी सवय आहे. मी त्यांच्या विधानाचा निषेध करते, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्षपदाच्या उमदेवारीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांचे नाव पुढे आले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा मेळावा ऑगस्ट महिन्यात शिकागो येथे होत आहे. यात कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र याविषयी अद्याप थोडी अनिश्चितता आहे. हॅरिस यांचे नाव जाहीर करण्याऐवजी पुन्हा एखादी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याविषयी डेमोक्रॅटिक नेते ठरवू शकतात. तसे झाल्यास हॅरिस यांना इतर प्रतिस्पर्ध्यांकडून आव्हान मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे बायडन यांनी माघार घेताना आपल्या सहकारी किंवा रनिंग मेट कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नेमके काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
कमला हॅरिस यांनी नेहमीच आपण भारतीय वंशाच्या असल्याचे सांगितलेले आहे. कालपरवापर्यंत अमेरिकेतील अनेकांना त्या भारतीय वंशाच्याच असल्याचे माहिती होते. मात्र, आता त्या अचानक कृष्णवर्णीय झाल्या आहेत. त्या कृष्णवर्णीय आहेत, हे मला माहिती नव्हते. त्या कधी कृष्णवर्णीय झाल्या याचीदेखील मला माहिती नाही, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.