संग्रहित छायाचित्र
ब्रिटनचे राजघराणे युरोपमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा राजघराणे चर्चेत आले असून प्रिन्स विल्यम आणि त्याच्या लहान भावाची प्रिन्स हॅरीची बायको मेगन मार्कल यांच्यातील वाद एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला आहे. प्रिन्स विल्यमचे मेगनच्या राजघराण्यातील प्रेवेशाला असलेले आक्षेप आणि सल्ल्यामुळे संबंध ताणले जाऊन हॅरी आणि मेगनने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लेखक रॉब जॉब्सन यांनी ‘कॅथरीन, द प्रिन्सेस ऑफ वेल्स’ या पुस्तकात ही माहिती दिली आहे.
प्रिन्स विल्यमने आपली पत्नी केट मिडल्टनला प्रपोज करताना आई डायनाची रिंग दिली होती. या दोघांचा शाही विवाह सोहळाही जगाने पाहिला. याच प्रिन्स विल्यमने प्रिन्स हॅरीची पत्नी मेगनला माझ्या आईचे दागिने तू घालू नकोस असे कठोर शब्दांत बजावले होते. एवढंच नाही प्रिन्स हॅरीने मेगनशी लग्न करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला प्रिन्स विल्यम यांची पसंती नव्हती. त्याने हॅरीला तू मेगन बरोबर असलेलं नातं संपुष्टात आणावे असा सल्ला दिला होता.
‘द इनसाईडर’ने याबबात वृत्त दिले असून त्यानुसार प्रिन्स विल्यमने ३९ वर्षीय हॅरीला असे सांगितले होतं की तू अभिनेत्री असलेल्या मेगनला लग्नाचं वचन देण्याआधी थोडा फेरविचार कर. तू लग्नाचं वचन दिलंस तर तिला राजेशाही थाटात जगायची सवय लागेल. लेखक रॉब जॉब्सन यांनी त्यांच्या ‘कॅथरीन, द प्रिन्सेस ऑफ वेल्स’ या पुस्तकात हा उल्लेख केला आहे. २०१८ मध्ये हॅरी आणि मेगन यांचा विवाह झाला.
विवाहापूर्वी हॅरी आणि विल्यममध्ये झालेल्या चर्चेचा तपशील पुस्तकात देण्यात आला आहेत. हे सगळं घडलं तरीही मेगन आणि हॅरी यांचा विवाह झाला. प्रिन्स विल्यमने मेगनला हेही बजावले होते की लग्नात तू माझी आई डायनाचे दागिने घालायचे नाहीस. तसंच तिचा कुठलाही ड्रेसही तू वापरायचा नाही. पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की मेगन आणि हॅरी यांच्या लग्नाच्या आधीच प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांच्यातील नात्यांमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले होते. मेगनचे राजघराण्यात प्रवेश करणे मुळातच प्रिन्स विल्यमला पसंत नव्हते.
कोण आहे मेगन मार्कल?
ब्रिटनच्या राजघराण्यात प्रवेश करण्यापूर्वी मेगन मार्कल एक अभिनेत्री होती. २०११ ते २०१८ या कालावधीत मेगनने ‘सूट्स’ मध्ये रॅचल जोन ही भूमिका साकारली होती. ‘सूट्स’ हा एक अमेरिकन टीव्ही ड्रामा होता आणि तो कमालीचा लोकप्रिय होता. मेगनचा जन्म ४ ऑगस्ट १९८१ ला लॉस एंजल्समध्ये झाला. २००२ मध्ये आलेल्या ‘जनरल हॉस्पिटल’ या चित्रपटातून तिने फिल्म करिअर सुरू केले. मेगनने आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि थिएटर या विषयांमध्ये शिक्षण घेतलं आहे. अर्जेंटीनाच्या अमेरिकी दुतावासात तिने इंटर्नशिपही केली आहे. सिनेमात काम करण्याआधी ती फ्रिलान्स कॅलिग्राफी करत होती. हॅरी आणि मेगनचा विवाह राजघराण्याला पटलेला नाही. राजघराण्यात मारले जाणारे टोमणे, दिली जाणारी दुषणं यामुळे त्यांनी राजघराणं सोडून कॅलिफोर्नियात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला.
आता मेगनला प्रिन्स विल्यमने नेमके काय सल्ले दिले होते त्याचा तपशील नव्या पुस्तकामुळे समोर आला आहेत. हॅरी जेव्हा मेगनला भेटायला घेऊन आला, तेव्हाही काहीसं विचित्र वातावरण निर्माण झाले होतं. लेखक रॉब जॉब्सन यांनी पुस्तकात असेही म्हटले आहे की हॅरीने प्रिन्स विल्यमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मेगन हळूहळू राजघराण्यात रुळेल, आपण तिला थोडा वेळ देऊ असंही तो म्हणाला होता. मात्र प्रिन्स विल्यमने हॅरीला तिच्याबरोबरचे संबंध संपवण्याचा निर्णय घे, असं सांगितलं होते.