संग्रहित छायाचित्र
अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. हॅरिस यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागच्या ३ आठवड्यांपासून ट्रम्प यांची निवडणूक मोहीम ढेपाळली आहे. कमला हॅरिस याचे आव्हान परतवून लावण्यासाठी ट्रम्प यांना एखादी ठोस रणनीती बनवण्यात यश मिळालेले नाही. या दरम्यान ट्रम्प यांनी सोमवारी
(१२ ऑगस्ट) दावा केला की, गेल्या आठवड्यात उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या मिशिगन रॅलीला गर्दी नव्हती. कमला हॅरिस यांच्या रॅलीत गर्दी दाखवण्यासाठी एआयची मदत घेतली होती. त्यामुळे हॅरिस यांना २०२४ च्या निवडणुकीतून अपात्र घोषित केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अशी आभासी आणि बनावट प्रतिमा उभी करून निवडणूक लढवणे गैर असल्याचेही ट्रम्प म्हणाले आहेत.
ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेच्या न्याय विभागावर १०० दशलक्ष डॉलर खटल्याची तयारी
ट्रम्प सध्या अमेरिकेच्या न्याय विभागावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची तयारी करत आहेत. न्याय विभागावर ते १०० दशलक्ष डॉलरचा खटला दाखल करण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी त्यांचे वकील आवश्यक गोपनीय कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबाबत झालेल्या सर्वेक्षणात जनतेने ट्रम्प यांच्यापेक्षा हॅरिस यांच्यावर जास्त विश्वास व्यक्त केला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था हॅरिस यांच्या हातात सुरक्षित राहील, असा विश्वास जनतेला वाटत आहे. फायनान्शियल टाइम्स आणि मिशिगन विद्यापीठाद्वारे केलेल्या सर्वेक्षणात आढळले की, ४२ टक्के मतदार आर्थिक मुद्द्यांवर हॅरिस यांच्यावर विश्वास ठेवतात. हे प्रमाण ट्रम्प यांच्यापेक्षा १ टक्का जास्त आहे. दुसरीकडे, ४१ टक्के लोकांना वाटते की, ट्रम्प अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर आणू शकतात.
हॅरिस सकारात्मक चित्र उभे करताहेत
आपल्या पहिल्या भाषणाच्या सुरुवातीला, मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी कमला हॅरिस यांचा संदर्भ देत म्हणाले, हॅरिस देशातील मतदारांसमोर आनंददायक आणि आशादायी चित्र उभे करत आहेत. कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘हॅपी वॉरियर्स’ असे नाव दिले.
याउलट फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, आपल्याकडे बऱ्याच वाईट गोष्टी येत आहेत आणि अमेरिका १९२९ किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या काळ्या दिवसांसारख्या आर्थिक मंदीत जाऊ शकते. ट्रम्प सातत्याने जनतेत भीती दाखवत सुटले आहेत. ते नकारात्मक वातावरण निर्माण करून मतदारांना आपल्याला मतदान करण्यासाठी भाग पाडत असल्याचेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.