File Photo
श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान हरिनी अमरसूर्या यांचे भारताशी विशेष नाते आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. हरिनी या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या असून याआधाी सिरिमावो भंडारनायके आणि त्यांची मुलगी चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवलं आहे. चंद्रिका आधी पंतप्रधान आणि नंतर देशाच्या अध्यक्ष झाल्या होत्या.
श्रीलंकेचे नवे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) संसद बरखास्त करण्याच्या विशेष अधिसूचनेवर स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी चार सदस्यीय मंत्रिमंडळाची स्थापना केली. यात हरिनी अमरसूर्या यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली. दिसानायके यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. एनपीपी खासदार विजीता हेराथ व लक्ष्मण निपुणाराच्ची यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधानांचं भारताशी खास कनेक्शन आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. श्रीलंकेच्या १६ व्या पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या हरिनी यांनी ९० च्या दशकात दिल्लीतील प्रतिष्ठित हिंदू महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. १९९१ ते १९९४ या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदवी मिळवली आहे.
मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके (५६) हे श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. ते मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे नेते आहेत. त्यांनी समगी जन बलवेगया (एसजेबी) पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव केला. श्रीलंकेत ‘एकेडी’ नावाने परिचित असलेले दिसानायके देशाचे मार्क्सवादी विचारसरणीचे पहिले अध्यक्ष आहेत.
भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि राजकीय संस्कृतीत बदल घडवण्याचे दिलेल्या आश्वासनामुळे तरुण मतदारांची दिसानायके यांना विशेष पसंती मिळाल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. दिसानायके यांच्या एनपीपीला २०१९ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ तीन टक्के मते मिळाली होती. ते मूळचे उत्तर मध्य प्रांतातील ग्रामीण थंबुटेगामाचे रहिवासी आहेत. त्यांनी कोलंबोमधील केलनिया विद्यापीठातून विज्ञान पदवीचे शिक्षण घेतले आहे.