हमासच्या प्रमुखाची तेहरानमध्ये स्फोटात हत्या

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्राएलमधील तणाव वाढला असून त्यातच इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 1 Aug 2024
  • 12:10 pm
tension between Iran and Israel, Ismail Haniyeh, political head of Hamas, Tehran, capital of Iran, Revolutionary Guard Corps

संग्रहित छायाचित्र

हत्येला इस्राएल जबाबदार असल्याचा आरोप, तणावामध्ये वाढ

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्राएलमधील तणाव वाढला असून त्यातच इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, या हत्येला हमासने इस्राएलला जबाबदार धरले असून यामुळे तणावाच्या वातावरणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. इस्राएलने मात्र हमासच्या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करून स्फोट घडविल्याने हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिया आणि एका रक्षकाचा मृत्यू झाला आहे. हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या स्फोटाला आणि हानियाच्या मृत्यूला हमासने इस्रायलला जबाबदार धरले आहे. याबाबत रिव्हाल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) सांगितले की, हानियाच्या तेहरानमधील निवासस्थानाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणण्यात आला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. आता या घटनेची चौकशी सुरु आहे,  इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हमासने हानियाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरले असून पॅलेस्टाईन संघटना हमासनेही हानियाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. इराणच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधी समारंभाला हनिया उपस्थित होता.

यावरून इराणमधील त्याच्या राजकीय महत्त्वाविषयी कल्पना यावी. मंगळवारी इराणच्या काही नेत्यांशी झालेल्या भेटीनंतर ही घटना घडली आहे. हमासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येला इस्राएल जबाबदार असल्याचे हमासने म्हटलं आहे. मात्र, याबाबत इस्राएलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. इस्माईल हानियाचा जन्म १९६२ मध्ये गाझा पट्टीत झाला. पॅलेस्टिनी नेता म्हणून इस्माईल हानियाला ओळखलं जात होतं. २०१७ मध्ये हमासचा प्रमुख राजकीय नेता म्हणून इस्माईल हानियाला ओळखलं जात होतं.

दरम्यान, इस्राएलने मंगळवारी उशिरा लेबनॉनची राजधानी बेरूतवर प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले केले. यामध्ये तीनजणांचा मृत्यू झाला असून ७४ जण जखमी झाले आहेत. इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या एका दहशतवाद्याला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा इस्राएली लष्कराने केला आहे. मारला गेलेला दहशतवादी हिजबुल्लाचा कमांडर हज मोहसीन उर्फ फुआद शुकर असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्त्राएली लष्कराने दावा केला की त्यांच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी बैरूत भागात फुआदला ठार केले. गोलान टेकड्यावरील हल्ल्यासाठी फुआद जबाबदार असल्याचा दावा इस्राएली लष्कराने केला आहे. हिजबुल्लाह किंवा लेबनॉनकडून फुआदच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही. यापूर्वीहिजबुल्लाहने इस्राएलवर गेल्या १० महिन्यांतील सर्वात मोठा हल्ला केला होता.

गोलान टेकड्यांच्या फुटबॉल मैदानावर लेबनॉनमधून रॉकेट डागले गेले. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. फुआदला अल-हज मोहसिन या नावानेही ओळखले जाते. १९८३ मध्ये बैरूतमधील यूएस मरीन कॉर्प्सवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामध्ये २४१ अमेरिकन सैनिक मारले गेले तर १२८ जखमी झाले. फुआदला अमेरिकेने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी अमेरिकेने ५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४२ कोटी) बक्षीस देऊ केले होते. लेबनॉनमधील हिजबुल्लाह तळावर इस्राएलने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने म्हटले की, इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest