संग्रहित छायाचित्र
ढाका : कधी काळी भारताचा भाग असलेल्या बांगलादेशच्या नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्कादायक सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालला मोदींच्या राजवटीतून मुक्त करून स्वतंत्र घोषित करा, असे विधान जसीमुद्दीन रहमानी या नेत्याने केले आहे.
बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वीच्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. यानंतर युनूस अंतरिम सरकारने काही दिवसांपूर्वी बांगलादेशी इस्लामिक कट्टरपंथी जसीमुद्दीन रहमानी याला तुरुंगातून सोडले.
या संदर्भात एक व्हीडीओ व्हायरल झाला असून त्यात जसीमुद्दीन रहमानी हा दिल्लीमध्ये इस्लामिक झेंडे फडकवा, असे भारताविरोधात विधान करताना दिसत आहे. रहमानी म्हणतो की, बांगलादेश सिक्कीम किंवा भूतानसारखा नाही. हा १८ कोटी मुस्लिमांचा देश आहे. तुम्ही बांगलादेशच्या दिशेने गेलात तर आम्ही चीनला सिलिगुडी कॉरिडॉर बंद करण्यास सांगू आणि आम्ही उत्तर-पूर्व भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यास प्रोत्साहन देऊ.
रहमानीला हत्येच्या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. रहमानी म्हणतो की, आम्ही पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना बंगालला मोदींच्या राजवटीतून मुक्त करण्यास आणि स्वातंत्र्याची घोषणा करण्यास सांगू. काश्मिरींना थेट आवाहन करताना तो म्हणतो, मी काश्मिरींना सांगू इच्छितो की, स्वातंत्र्यासाठी तयार राहा. मला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून काश्मीरला पाठिंबा द्यायचा आहे. मी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्याचे आवाहन करतो. मला पाकिस्तान, अफगाणिस्तानला सांगायचंय की काश्मीरला मदत करा, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी काम करा.