संग्रहित छायाचित्र
ओमानमधील मशिदीजवळ झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत. राजधानी मस्कत येथील वाडी अल-कबीर मशिदीजवळ मंगळवारी सकाळी हा गोळीबार झाला. ‘अल जझिरा’ने दिलेल्या माहितीनुसार, मशिदीमध्ये शिया धर्मीयांशी संबंधित एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी हा गोळीबार झाला.
ओमान पोलिसांनी सांगितल्यानुसार गोळीबार झालेल्या भागातील सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. हा हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ल्याशी संबंधित अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्यानुसार गोळीबार सुरू होताच मशिदीत गोंधळ उडाला. लोकांनी जवळच्या इमाम अली मशिदीत आश्रय घेतला. या हल्ल्यात काही पाकिस्तानी नागरिकही जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे राजदूतही रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी त्यांची भेट घेतली. मस्कतमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
ओमानचा वापर अनेक वेळा अन्य देशांमधील करार करण्यासाठी आणि तणावाच्या परिस्थितीत संतुलन राखण्यासाठी होत असतो. तसेच ओमानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूपच कमी असल्याने हा देश तसा शांत असतो.
ओमानमधील शिया मुस्लीम मंगळवारी 'आशुरा' साजरा करत होते. या दिवशी शिया ७ व्या शतकात प्रेषित मुहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांच्या लढाईत झालेल्या हौतात्म्याची आठवण करतात. या दिवशी अनेक शिया मुस्लीम इराकमधील इमाम हुसेन यांच्या दरबाराला भेट देतात. उपवासही ठेवतात. ओमानची ८६ टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. यापैकी ४५ टक्के सुन्नी मुस्लीम आणि ४५ टक्के इबादी मुस्लीम आहेत. देशातील लोकसंख्येच्या ५ टक्के शिया आहेत.