पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच लष्कराविरोधात पोलीस रस्त्यावर

इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानमध्ये पोलीसदल आणि लष्करामध्ये वाद उफाळून आला असून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये पोलिसांनी आंदोलनाचे हत्यार उपसत चक्काजाम केला आहे. खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या परिसरातून आयएसआय, लष्कराला हटवण्याची मागणी करत पोलिसांनी गेल्या पाच दिवसांपासून संप पुकारला आहे. ९ सप्टेंबरपासून शेकडो पोलिसांनी सिंधू महामार्ग रोखून धरला आहे. हा महामार्ग पेशावर आणि कराचीला जोडतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 14 Sep 2024
  • 03:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

खैबर पख्तूनख्वामधून लष्कर, आयएसआय हटविण्याची मागणी, पाच दिवसांपासून संप

इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानमध्ये पोलीसदल आणि लष्करामध्ये वाद उफाळून आला असून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये पोलिसांनी आंदोलनाचे हत्यार उपसत चक्काजाम केला आहे. खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या परिसरातून आयएसआय, लष्कराला हटवण्याची मागणी करत पोलिसांनी गेल्या पाच दिवसांपासून संप पुकारला आहे. ९ सप्टेंबरपासून शेकडो पोलिसांनी सिंधू महामार्ग रोखून धरला आहे. हा महामार्ग पेशावर आणि कराचीला जोडतो. 

खैबर पख्तूनख्वाच्या लक्की मारवतमध्ये पोलिसांच्या कामात लष्कर हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या आंदोलनात आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलीस अधिकारीही सहभागी झाले आहेत यामध्ये बन्नू, डेरा इस्माईल खान आणि टँक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अनेक राजकीय पक्षही पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आयएसआय आणि लष्करी गुप्तचर संस्था या भागातील वातावरण बिघडवत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांचे अपहरण करून लष्कराने त्यांची हत्या केल्याचेही ते सांगतात. 

पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार, गेल्या वर्षभरात बन्नू, डेरा इस्माईल खान आणि लकी मारवतमध्ये अनेक पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. त्याचबरोबर पोलिसांची कुटुंबे आणि घरांनाही लक्ष्य केले गेले आहे. पाकिस्तानात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस लष्कराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. लष्कराने येथून निघून जावे आणि पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या परिसरात शांतता प्रस्थापित केली जाईल, असे  पोलिसांनी म्हटलं आहे. लष्कर तालिबान सारखे वागत असून आम्ही ज्या दहशतवाद्यांना अटक करतो त्यांना लष्कर सोडायला सांगते, असे त्यांचे म्हणणे आहे.

खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात आहे. विशेषत: अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात लष्कराचे अस्तित्व आहे. तालिबान आणि इतर अनेक संघटनांशी त्यांची लढाई सुरू आहे. येथील पोलिओ विरोधी पथकासोबतही काम करण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. अलीकडेच पोलिओ ड्यूटीवर असताना एका पोलिसाची हत्या झाली होती. खैबर पख्तूनख्वामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पोलिसांनी प्राण गमवले आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये या वर्षी सुमारे ७५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest