संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात लढत होणार असून या नेत्यांतील पहिली जाहीर चर्चा पुढील महिन्यात १० सप्टेंबर रोजी होणार आहे. या चर्चेला दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यात पहिल्यांदाच समोरासमोर वाद होणार आहे.
ट्रम्प यांना कमला हॅरिस यांच्यासोबत तीन वादविवाद करायचे आहेत. ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले की, वादविवाद होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी ४ सप्टेंबर रोजी फॉक्स, १० डिसेंबर रोजी एबीसी आणि २५ सप्टेंबर रोजी एनबीसी वाहिन्यांवर वादविवाद करण्यास सहमती दर्शविली आहे. वादविवादांचे स्थान काय असेल आणि किती लोक असतील, यावर चर्चा केली जात आहे. या तिन्ही चर्चेसाठी त्या इतरांच्या संमतीची वाट पाहात आहेत. अमेरिकेची स्थिती अत्यंत वाईट असून जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत कमला या काहीही करू शकणार नाहीत. कमला यांना राष्ट्रपतिपदाचा उमेदवार होण्यासाठी आवश्यक मतेही मिळाली नाहीत आणि आता त्या निवडणूक लढवत आहेत.
ट्रम्प यांनी कमला यांचे कमकुवत उमेदवार असे वर्णन केले. ते म्हणाले की, त्या पत्रकारांना मुलाखतही देत नाहीत. त्या माध्यमांना घाबरत असल्याने मुलाखती टाळतात. त्यांच्याशी वाद घालण्याची त्यांची पात्रता नाही. असे असले तरी आतापर्यंतची परंपरा म्हणून मी त्यांच्याशी चर्चेत भाग घेणार आहे.
उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी या अगोदर एबीसी वाहिनीवरील चर्चेला सहमती दर्शवली होती. त्या म्हणाल्या की, ट्रम्प यांनी वादविवादाला सहमती दिल्याचा मला आनंद झाला. मी त्याची आतुरतेने वाट पाहात आहे. मला आशा आहे की ट्रम्प चर्चेसाठी येतील. बाकीच्या चर्चेसाठी आपण तयार आहात का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, १० सप्टेंबरनंतर आपण आणखी एका चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रम्प म्हणाले होते की, जर कमला हॅरिस ४ सप्टेंबर रोजी फॉक्स न्यूजच्या चर्चेत सहभागी झाल्या नाहीत तर ते त्यांच्यासोबत उर्वरित वादविवाद करणार नाहीत. कमला हॅरिस ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वादविवादात सहभागी होणार की नाही याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
यापूर्वी, जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात १ वादविवाद झाले होते. यातील एक वाद २७ जून रोजी झाला. त्यात बायडेन यांची कामगिरी निस्तेज झाली आणि सार्वत्रिक टीकेनंतर बायडेन यांनी उमेदवारी मागे घेतली. बायडेन यांच्याशी चर्चेच्या करारानुसार १० सप्टेंबर रोजी वादाची दुसरी फेरी होणार होती. ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात १० सप्टेंबरला फिलाडेल्फियामध्ये वाद होऊ शकतो. हा वादविवाद एका मैदानावर ९० मिनिटे सुरू असेल आणि डेव्हिड मायोह, लिन्से डेव्हिस त्याचे नियंत्रण करतील. या वादात प्रेक्षकही थेट सहभागी होतील.