संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकन काँग्रेसमध्ये म्हणजेच संसेदेमध्ये भारतीय अमेरिकन खासदारांना ‘समोसा कॉकस’ म्हटले जाते. दक्षिण आशियायी समाज अमेरिकेमध्ये अत्यंत प्रभावी आहे. आणि त्यामुळे रिपब्लिकन असो वा डेमोक्रॅट सर्वांना ते हवे असतात. काल लागलेले अध्यक्षपदाच्या निवडणूकिमध्ये सहा भारतीय अमेरिकन खासदारांना विजयी झाले. यापूर्वी सध्या पाच भारतीय अमेरिकन होते. व्हर्जिनिया आणि संपूर्ण ईस्ट कोस्टमधून निवडून येणारे वकिल सुहास सुब्रमण्यम यांच्या विजयाने आता त्यांची संख्या सहा झाली आहे. याआधीचे पाच खासदार अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार हे होते.
समोसा कॉकस नाव थोडं वेगळे आहे, पण खूप शक्तीशाली आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याची जोरदार चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही प्रमुख उमेदवारांना त्याचे महत्त्व मान्य होते. हा शब्द कसा आला आणि त्याचा प्रभाव कसा आहे याबद्दल समजून घेणे गरजेचे आहे.
कसा आला समोसा कॉकस
अमेरिकन काँग्रेसमध्ये (संसद) भारतीय अमेरिकन खासदारांबाबत ही गोष्ट सांगितली जाते. भारतामधील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला समोसा आवडतो. त्यामुळेच अमेरिकेत भारतीय वंशाच्या भारतीय खासदारांना समोसा कॉकस म्हंटलं जातं. हा शब्द सन २०१८ च्या आसपास इलिनोइसचे राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन राजकारणातील भारत-अमेरिकामधील वाढत्या प्रभावाबद्दल वापरला होता. या कॉकसमध्ये प्रतिनिधी सभा आणि सिनेटमधील दक्षिण आशियातील सदस्यांचा समावेश असतो.
समोसा कॉकसमध्ये किती खासदार?
समोसा कॉकसमध्ये भारतीय वंशाचे ६ अमेरिकन प्रतिनिधी आहेत. उपाध्यक्ष कमला हॅरिस त्याच्या अध्यक्षा आहेत. पण, त्या कोणत्याही संसदेच्या सदस्य नाहीत. वर्जिनियामधील डेमॉक्रेटीक पक्षाचे प्रायमरी निवडणूक जिंकणारे सुहास सुब्रमण्यम स्वामी सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यामुळे तर त्यांचा ही समोसा कॉकसमध्ये समावेश झाला आहे.
'कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनेशनल पीस' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या जवळपास ३.९ मिलियन भारतीय अमेरिकन नागरिकांचा मतदारांच्या वयोगटात समावेश होतो. त्यापैकी २.६ मिलियन नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी त्यांना आकर्षित करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
याच सर्वेक्षणानुसार ६० टक्के भारतीय-अमेरिकन डेमॉक्रेटिक पक्षाला पाठिंबा देतात. अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील पाठिंबा वाढत आहे. जवळपास एक तृतीयांश भारतीय-अमेरिकन मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करण्याचे संकेत दिले आहेत.
६७ टक्के भारतीय अमेरिकन महिलांचा कमला हॅरिसला पाठिंबा आहे. तर ५३ टक्के पुरुष कमला हॅरिसच्या बाजूनं आहेत. २२ टक्के भारतीय-अमेरिकन महिलांनी ट्रम्प यांना मतदान करण्याची इच्छा व्यक्त केलीय. तर ३९ टक्के पुरुषांचा ट्रम्प यांना पाठिंबा आहे. अर्थात भारतीय वंशाचे मतदारांची नेमकी पसंती कुणाला आहे हे मंगळवारी मतदानाच्या नंतरच स्पष्ट होईल.
पंतप्रधान मोदींनीही केला होता उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २३ जून २०२३ रोजी अमेरिकन संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले होते. त्यावेळी देखीस समोसा कॉकसचा उल्लेख केला होता. त्याला अमेरिकन खासदारांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. पंतप्रधानांनी अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहात भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या वाढत्या प्रतिनिधित्वाचा उल्लेख केला होता.
पंतप्रधानांनी त्या भाषणात कमला हॅरीस यांच्याकडं इशारा करत सांगितलं होते की, 'भारतीय वंशाच्या अनेक लोकांपैकी एक माझ्या मागे बसली आहे. त्यांनी इतिहास घडवलाय. आता समोसा कॉकसचा रंग अमेरिकन संसदेवरही चढलाय असे मला सांगण्यात आले आहे. समोसाप्रमाणेच भारतीय पदार्थांचं वैविध्य या संसदेमध्ये असावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतीय पदार्थ मसाला डोसा आणि बंगाली मिठाई संदेशचा उल्लेखही त्यांच्या भाषणात केला होता.