संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: जगात कधी काय होईल आणि कधी काय होणार नाही हे सांगता येत नाही, पण अशा काही घडामोडी होतात ज्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत होऊन जातात. कधी तर आपल्याच डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही. अशाच काही गोष्टी आणि घडामोडी विश्वविक्रम बनवून जातात. गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दररोज कोणते ना कोणते अतिशय वेगळे आणि रंजक रेकॉर्ड होत असतात, पण काही रेकॉर्ड हे हैराण करणारे असतात. असेच एक रेकॉर्ड सध्या जगात चर्चेचा विषय ठरले आहे. हे रेकॉर्ड कोणी व्यक्तीने नाही तर एका वांग्याने केले आहे.
वांगे म्हटले तर त्याचा एक विशिष्ठ आकार असतो. विशिष्ठ असे वजनही असते. मात्र एका व्यक्तीने लावलेल्या वांग्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. हे वांगे आहे की भोपळा आहे, असा प्रश्न हे वांगे पाहिल्यानंतर सर्वांनाच पडला आहे. एखाद्या वांग्याचे वजन साधारणपणे १५० ते २०० ग्राम असते. काही वेळा तर यापेक्षाही लहान वांगी आपल्याला पाहायला मिळतात. या वांग्याची लागवड डेव बेनेट या व्यक्तीने केली आहे. त्यांनी जे वांगे लावले त्याचे वजन तब्बल ३.७७ किलो भरले आहे. हे एक रेकॉर्ड आहे. एवढ्या वजनाचे वांगे या आधी कुणीही उत्पादित केले नव्हते. त्यामुळे या वांग्याची नोंद गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
काय आहेत या वांग्याची वैशिष्ट्ये?
या वांग्याचा आकार एखाद्या भोपळ्याएवढा आहे. सर्वसामान्य वांग्यापेक्षा याचे वजन जवळपास दहा पट जास्त आहे. अमेरिकेत राहणारे डेव यांनी याची लागवड एप्रिल महिन्यात केली होती. रेकॉर्ड किपरवर याबाबतची माहिती देण्यात आली होती. शिवाय हे जगातले सर्वात मोठे वांगे असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. एप्रिलमध्ये लावण्यात आलेले हे वांगे ३१ जुलैला कापण्यात आले. त्यानंतर त्याचे वजनही करण्यात आले. त्यावेळी ते जगातले सर्वात मोठे वांगे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याची जागतिक विक्रमात नोंद झाली. या वांग्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.
गीनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इंस्टाग्राम @guinnessworldrecords वर तो शेयर करण्यात आला आहे. गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सांगण्यात आले आहे की, 'डेव बेनेट यांनी लावलेले वांगे हे ३.७७८ किलोचे आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने हा चमत्कार असल्याचे सांगत खरोखर हे रेकॉर्ड आहे असे म्हटले आहे. एकाने तर जबरदस्त असे म्हटले आहे तर एका वापरकर्त्याने असे होऊ शकते का, असा प्रश्न करत प्रतिसाद दिला आहे.