कोरोना झाल्याने बायडेन यांच्या अडचणी वाढल्या, माघार घेण्याचा विचार; कमला हॅरिस बनू शकतात अध्यक्षपदाच्या उमेदवार

वॉशिंग्टन:  अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि अध्यक्ष ज्यो बायडेन आपली उमेदवारी मागे घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. त्यांनी उमेदवारी मागे घेतली तर सध्याच्या उपाध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्याकडे अध्यक्षपदाची उमेदवारी जाण्याची शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 20 Jul 2024
  • 11:09 am
Washington, Corona, President Joe Biden, Kamala Harris

संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन:  अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि अध्यक्ष ज्यो बायडेन आपली उमेदवारी मागे घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. त्यांनी उमेदवारी मागे घेतली तर सध्याच्या उपाध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्याकडे अध्यक्षपदाची उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे उमेदवारी मागे घ्यावी लागली तर डेमोक्रॅटिक पक्षाला नाचक्कीस सामोरे जावेल लागणार असून अशा प्रकारची घटना आजपर्यंत घडली नसल्याचे सांगितले जाते.

८१ वर्षांचे ज्यो बायडेन वाढत्या वयामुळे बोलताना अडखळतात आणि चालतानाही धडपडतात. त्यातच आता त्यांच्यासमोरील संकट आणखी वाढले असून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे, ते अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत. आतापर्यंत माघार न घेण्याबाबत ठाम असलेले बायडेनदेखील आता माघार घेण्याचा विचार करू लागल्याचे वृत्त आहे. पहिल्या अध्यक्षीय चर्चेत त्यांचा प्रभाव काहीही पडला नाही. त्यांच्या तुलनेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगली बाजी मारली. प्रश्न मांडण्यामध्ये बायडेन फिके पडल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी आणि नवा उमेदवार उभा करावा, असा एक मतप्रवाह डेमोक्रॅटिक पक्षामध्ये प्रबळ होऊ लागला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी सभापती  नॅन्सी पेलोसी अशा मातब्बर नेत्यांकडूनही या मागणीला पाठिंबा दिला जात आहे. अध्यक्षपदासाठी बायडेन यांच्याऐवजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

हल्ल्यातून सुखरूप बचावल्यावर रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांच्या उमेदवारीवर तातडीने शिक्कामोर्तब केले आहे. हल्ल्यानंतर पहिल्यांदाच ट्रम्प मिलवॉकीमध्ये बोलत होते. त्यांच्या जखम झालेल्या कानाला पट्टी लावली होती. काही समर्थकांनीही कानाला पट्टी लावून त्यांना समर्थन दिले. ट्रम्प म्हणाले की, आतापासून केवळ चार महिन्यांनंतर आपण एक अतुलनीय असा विजय साजरा करू. मी फक्त अर्ध्या अमेरिकेचा नव्हे, तर संपूर्ण अमेरिकेचा अध्यक्ष असेन.

शनिवारी (१३ जुलै) पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे ट्रम्प यांच्या ‘फार्म शो’चे आयोजन केले होते. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर उंच ठिकाणी लपून बसलेल्या २० वर्षीय हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्या  गेल्या. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली आणि ते जखमी झाले. हल्लेखोराचा नेम चुकला नसता, तर गोळी थेट त्यांच्या डोक्यात शिरण्याचा धोका होता. मात्र, ते यातून सुखरूप बचावले आहेत.

या हल्ल्याचे वर्णन करताना ट्रम्प म्हणाले की, सगळीकडे रक्त सांडलं होतं. मात्र, मला फारच सुरक्षित वाटत होतं, कारण देव माझ्या बाजूने होता. जर मी माझे डोके, त्या शेवटच्या क्षणाला अचूकपणे हलवले नसते तर कदाचित हल्लेखोराच्या गोळीने माझ्या डोक्याचा वेध घेतला असता. असे झाले असते तर कदाचित आज मी तुमच्याबरोबर उभा नसतो. केवळ सर्वशक्तिमान देवाच्या कृपेने आज मी तुमच्यासमोर उभा आहे. अनेक लोकांनी असे म्हटले की, माझ्या वाचण्यामागे ईश्वराची करणी कारणीभूत आहे. आता मी अर्ध्या अमेरिकेचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकेचा अध्यक्ष होण्यासाठी जिवाचे रान करत आहे. केवळ ५० टक्के अमेरिकेचा अध्यक्ष होण्यात काही अर्थ नाही.” 

देव माझ्या बाजूने - ट्रम्प
अमेरिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही निवडणूक होणार आहे. एकीकडे जो बायडेन यांनी वार्धक्याच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेऊन तरुण उमद्या नेत्याच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत असताना दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले. मात्र, हल्ल्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच ‘देव माझ्या बाजूने’ असल्याचे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest