संग्रहित छायाचित्र
रिओ द जानेरो: ब्राझीलमधील प्रसिद्ध गायक आयरेस सासाकी याचा कॉन्सर्ट सुरू असताना अपघाती मृत्यू झाला आहे. सासाकी हा ब्राझीलच नव्हे तर जगभरात कार्यक्रम करायचा. तो ब्राझीलमध्ये लोकप्रिय असण्याबरोबर संगीत विश्वात त्याने स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्याचा कार्यक्रम पाहायला हजारो लोक यायचे. सासाकीचा मृत्यू कार्यक्रमात अपघातामुळे झाला आहे. सासाकीने यावेळी एका चाहत्याला मिठी मारली आणि तो भिजला. त्यानंतर एका विद्युतवाहिनीला त्याचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून त्याने रंगमंचावरच प्राण सोडला. अवघ्या ३५ व्या वर्षी आयरेसने जगाचा निरोप घेतला.
सासाकीने ११ महिन्यांपूर्वी त्याची प्रेयसी मारियाना हिच्याशी लग्न केलं होतं. आयरेसच्या दुर्दैवी मृत्यूचा तिला मोठा धक्का बसला असून तिला रुग्णालयात न्यावे लागले आहे. आयरेसचा सॅलिनोपोलीमधील सोलर हॉटेलमध्ये कार्यक्रम सुरू होता. सासाकीचं गाणं ऐकण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने जमले होते. त्याच वेळी एक पाण्याने भिजलेला चाहता सासाकीला भेटण्यासाठी जवळ गेला. सासकीनेही चाहत्याला निराश न करता त्याला मिठी मारली. त्यामुळे सासाकीही भिजला. त्याचवेळी एका केबलला (विजेची तार) त्याचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला आणि त्याने मंचावरच प्राण सोडले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा चाहता पाण्यात भिजून का आला होता, याची पोलीस चौकशी करत आहेत.
सासाकीची काकी यावेळी उपस्थित होती. ती म्हणाली, आयरेसचा कार्यक्रम निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ चालला. कॉन्सर्टवेळी जे लोक उपस्थित होते, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं कशामुळे घडलं ते आम्हाला समजून घ्यायचे आहे. पोलिसांनी काही प्रत्यक्षदर्शींकडे घटनेची चौकशी केली आहे. सोलर हॉटेलने म्हटलं आहे की आम्ही तपास करणाऱ्या पोलिसांना सर्व प्रकारची मदत करू.