संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी घसरती लोकप्रियता सावरण्यासाठी सहानुभूतीचे कार्ड वापरण्यास सुरुवात केल्याचे दिसते. त्यामुळे ट्रम्प यांना पराभवाच्या धास्तीने घेरल्याचे दिसते. यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक हरलो तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. त्यातच सीबीएस न्यूज सर्वेक्षणात, कमला यांना ५२ टक्के तर ट्रम्प यांना ४८ टक्के मते मिळाली आहेत.
एका मुलाखतीत यावेळी कमला हॅरिस यांच्याकडून पराभूत झाल्यास ते २०२८ मध्ये निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले, मला वाटत नाही की मी पराभूत होईन. तसे झाले तर मात्र मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. यावेळी आम्ही यशस्वी होऊ, असा मला विश्वास आहे. ट्रम्प गेल्या तीन निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या या उत्तरावरून एकंदरीत त्यांचा विजयाचा विश्वास मावळताना दिसत आहे. गेल्या ४ दिवसांत निवडणूक हरण्याच्या शक्यतेबद्दल बोलण्याची ट्रम्प यांची ही दुसरी वेळ आहे.
या आधी ट्रम्प प्रत्येक रॅली, प्रचार आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचा दावा करत होते. १९ सप्टेंबर रोजी इस्राएल-अमेरिका कौन्सिलच्या एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले होते की, जर ते निवडणुकीत हरले तर ते मुख्यतः ज्यूंमुळे हरतील.
ट्रम्प यांच्या या विधानावर कमला हॅरिस यांच्या टीमने टीका केली होती. ट्रम्प यांच्या वक्तव्यांमध्ये पराभवाचा उल्लेख कमला यांच्या वाढत्या लोकप्रियतेशी जोडला जात आहे. खरं तर, अध्यक्ष बायडेन यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर, डेमोक्रॅटिक पक्ष निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
खरं तर, २८ जून रोजी झालेल्या अध्यक्षीय चर्चेनंतर, बायडेन यांनी उमेदवारी सोडावी अशी मागणी त्यांच्या पक्षातूनच झाली होती. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही बायडेन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यास सांगितले होते. अमेरिकन कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती दोनदा अध्यक्ष झाल्यानंतर निवडणूक लढवू शकत नाही. अशा परिस्थितीत ट्रम्प यांचा विजय झाला तर ही त्यांची दुसरी टर्म असेल आणि त्यांना अमेरिकेत पुढील निवडणूक लढवता येणार नाही.
अमेरिकेच्या राष्ट्रीय मतदान सर्वेक्षणात कमला या ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. अमेरिकेतील सीबीएस न्यूजच्या सर्वेक्षणात, कमला यांना ५२ टक्के मते मिळाली आहेत, तर ट्रम्प यांना ४८ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. अमेरिकेच्या राज्यांमध्ये जिथे सर्वात कठीण स्पर्धा आहे, तिथेही कमला यांना ट्रम्प यांच्या तुलनेत २ टक्के जास्त मते मिळाली आहेत. मात्र, काही बाबतीत ट्रम्प अजूनही उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या पुढे आहेत.
कमला हॅरिस या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पहिल्या कृष्णवर्णीय महिला उमेदवार आहेत. त्या अध्यक्ष झाल्या तर अमेरिकेच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. ५९ वर्षीय कमला हॅरिस या रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्षांकडून नामांकन मिळालेल्या अमेरिकेतील दुसऱ्या महिला आहेत.
बायडेन यांनी हॅरिस यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी २१ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. देश आणि पक्षाच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र बायडेन यांनी जाहीर केले होते.