अध्यक्षीय चर्चेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी मारली बाजी!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अध्यक्षीय चर्चेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी बाजी मारली आहे. चर्चेनंतरच्या सर्वेक्षणानुसार अर्ध्याहून अधिक लोकांचे असं म्हणणं आहे की, हॅरिस या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 12 Sep 2024
  • 03:50 pm

संग्रहित छायाचित्र

चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ६३ टक्के अमेरिकी नागरिकांची पसंती

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अध्यक्षीय चर्चेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी बाजी मारली आहे. चर्चेनंतरच्या सर्वेक्षणानुसार अर्ध्याहून अधिक लोकांचे असं म्हणणं आहे की, हॅरिस या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यापेक्षा वरचढ आहेत. लोकांच्या मते  हॅरिस यांनी वादविवाद जिंकला आहे. 

सीएनएन व एसएसआरएसच्या सर्वेक्षणानुसार चर्चा पाहणाऱ्या ६३ टक्के लोकांनी म्हटलं आहे की, वादात कमला हॅरिस जिंकल्या आहेत. केवळ ३७ टक्के लोकांचं म्हणणं आहे की या वादात ट्रम्प  वरचढ होते. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांत चर्चेच्या तीन फेऱ्या झडतात. सामान्य नागरिकांसह राजकीय विश्लेषक, पत्रकार या वादविवादाची आतुरतेने वाट पाहात असतात. चर्चेत अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाची झलक पाहायला मिळते असं म्हटलं जातं. अमेरिकेतील बहुसंख्य मतदार चर्चेच्या आधारे आपल्या नेत्याची निवड करतात, निवडणुकीत कोणत्या नेत्याला, पक्षाला पाठिंबा द्यायचा ते ठरवतात.

या चर्चेची पहिली फेरी जून महिन्यात झाली. त्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन विरुद्ध रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प असा सामना झाला. पहिल्या फेरीत ट्रम्प  हे बायडेन यांच्यावर वरचढ ठरले. त्यानंतर काल मंगळवारी, दुसरी फेरी पार पडली. यावेळी कमला हॅरिस व  डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सामना झाला. वादाच्या दुसऱ्या फेरीत कमला हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ ठरल्या. 

एबीसी न्यूज वृत्तवाहिनीने वादविवादाची दुसरी फेरी आयोजित केली होती. कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर शाब्दिक चर्चा झाली. अमेरिकेची अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क, इस्राएल-गाझा व रशिया-युक्रेन युद्ध, स्थलांतरितांचे प्रश्न यावर दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. सीएनएन व एसएसआरएसने चर्चेनंतर एक सर्वेक्षण केलं. यानुसार वादविवाद पाहणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की, कमला हॅरिस या जिंकल्या आहेत. 

वादविवादापूर्वी ५० टक्के लोक हॅरिस यांच्या तर  ५० टक्के लोक ट्रम्प यांचं समर्थन करत होते. वादाच्या पहिल्या फेरीनंतर ६७ टक्के लोकांनी ट्रम्प यांना तर ३३ टक्के लोकांनी बायडेन यांना पसंती दर्शवली होती.  दुसऱ्या फेरीनंतर हे चित्र बदललं आहे. २१ जुलै रोजी जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यानंतर पक्षाने कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं.

प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आपणच कसे योग्य आहोत, हे ठसविण्याचा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या वाद-विवादाचा प्रभावी वापर केला जातो. चर्चेच्या सुरुवातीला दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटून स्मितहास्य करत हस्तांदोलन केले. त्यानंतर मुद्दे मांडत असताना त्यांची आक्रमकता, राग आणि वक्तृत्वामध्ये टीकेची धार दिसून आली. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा बायडेन आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली, तेव्हा दोघांनीही एकमेकांना भेटून हस्तांदोलन करणे टाळले होते.

ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर (Democratic Party) टीका करताना जो बायडेन हे इतिहासातील सर्वात वाईट अध्यक्ष तर कमला हॅरिस या वाईट उपाध्यक्ष असल्याचे म्हटले. प्रत्युत्तरादाखल कमला हॅरिस म्हणाल्या की, मला विश्वास आहे की, अमेरिकन नागरिकांना आपल्यातले वेगळेपण आणि साम्य काय आहे, याची उत्तम जाणीव आहे. आपण नवीन मार्ग शोधू शकतो का, हेही जनतेला माहीत आहे.

अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा पुढे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर गेली. ट्रम्प अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हा देशात बेरोजगारी आणि नैराश्य पसरले होते. तसेच ट्रम्प आपल्या काळात कोरोना महामारीशी लढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. बायडेन सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या चुका निस्तरल्या होत्या, असेही हॅरिस म्हणाल्या. ट्रम्प यांच्याकडे अमेरिकी जनतेसाठी काहीही योजना नाहीत, असाही दावा हॅरिस यांनी केला.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest