संग्रहित छायाचित्र
ढाका: राजधानीत रविवारी रात्री विद्यार्थी आणि अन्सार गटाच्या सदस्यांमध्ये मोठा राडा झाला असून यात ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. नोकऱ्या कायम कराव्यात अशी मागणी केल्यावर दोन गटात वादाची ठिणगी पडली.
विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पदत्याग करून देश सोडल्यावरही देशातील स्थिती सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू नाही. या उलथापालथीनंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यावर जनजीवन रुळावर येत असल्याचे दिसत असतानाच हिंसाचाराची आग पुन्हा भडकली आहे.
रविवारी रात्री ढाकातील सचिवालयाजवळ मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालय ताब्यात घेतल्याचे कळल्यावरून ते जमले होते. त्यातच काही विद्यार्थी आत अडकले होते. ही माहिती सोशल मीडियावरून समजताच विद्यार्थ्यांनी सचिवालयाला घेराव घातला. यावेळी अन्सार गट आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटाचे ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले. अन्सार ग्रुपच्या सदस्यांचे दोन दिवसांपासून आंदोलन सुरू असून आपल्या नोकऱ्या कायम करण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. अन्सार ग्रुपच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.