संग्रहित छायाचित्र
जेरुसलेम: गाझा पट्टीतील हमासच्या बोगद्यात ओलीस ठेवलेल्या सहा इस्राएली नागरिकांचे मृतदेह हाती लागले आहेत. इस्राएलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार इस्राएली सैनिक या बोगद्यात पोहोचण्यापूर्वी हमासने ओलिसांची हत्या केली.
मृत ओलिसांमध्ये २३ वर्षीय अमेरिकी वंशाचा इस्राएली नागरिक हर्ष गोल्डबर्गचाही समावेश आहे. इस्राएली लष्कराला या भागात सहा ओलीस असल्याचे वृत्त मिळाले होते. यामुळे सैन्य अत्यंत सावधपणे पुढे जात होते. शनिवारी त्यांना हमासचा बोगदा सापडला. त्याची तपासणी केली असता तेथे ओलिसांचे मृतदेह सापडले.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्राएली नागरिकांचे किबुत्झ बिरी भागातून अपहरण करण्यात आले होते. हमासने एकूण २५१ इस्राएली नागरिकांना ओलीस ठेवले होते. यातील ९७ नागरिक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या युद्धविरामात १०५ ओलिसांची सुटका करण्यात आली होती. हमासच्या ताब्यात ३३ इस्राएली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, इस्राएलने गेल्या ५ दिवसांपासून वेस्ट बँकमध्ये कारवाई सुरू केली आहे. तुलकारम आणि जेनिन शहरांतील इस्राएली सैन्याच्या हल्ल्यात आतापर्यंत १७ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या कमांडरचाही समावेश आहे.
वेस्ट बँकमध्ये गेल्या वर्षभरातील इस्राएलची ही सर्वात मोठी लष्करी कारवाई आहे. वेस्ट बँकमध्ये रस्त्यावर चिलखती वाहने तैनात असून हल्ल्यांमुळे घरातील इंटरनेट, वीज आणि दूरध्वनी सेवा खंडित झालेली आहे. लोकांना अन्न आणि पाणीही मिळत नाही. इस्राएली सैनिकांनी छुप्या शस्त्रांच्या शोधात अनेक घरांवर छापे टाकले आहेत. यापूर्वी ८ जून रोजी इस्राएलने आपल्या ४ नागरिकांची हमासच्या कैदेतून सुटका केली होती. अमेरिकी, इस्राएली गुप्तचर लष्करी पथके ड्रोन, उपग्रह आणि इतर मार्गाद्वारे गाझामधील ओलिसांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. इस्राएली सैनिकांनी आपली आगेकूच कायम ठेवली तर इस्राएली ओलिसांना थेट गोळ्या घालण्याचा आदेश हमासने दिला आहे.