#वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होत त्यासाठी उभे असलेले माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला भारताच्या धोरणांवर टीका केली आहे तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. क्वाड शिखर परिषदेसाठी अमेरिकेत होणारे मोदींचे आगमन आणि भारतीय वंशाच्या मतपेढीवर असलेला डोळा याचा समतोल सांभाळत ट्रम्प यांनी भाषण केल्याचे दिसत होते.
प्रचार सभेत बोलताना ट्रम्प यांनी भारताची धोरणे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधात अडसर ठरत असून भारताकडून व्यापाराबाबत गैरवर्तणूक होत असल्याचा आरोप केला आहे.एका प्रचार सभेत ट्रम्प म्हणाले, पुढील आठवड्यात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून याबाबत चर्चा करू. मोदी पुढच्या आठवड्यात मला भेटायला येणार आहेत. मोदी विलक्षण माणूस आहे. जगातील बरेच नेते विलक्षण आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी २१ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपानच्या नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली आहे. यावेळी ट्रम्प आणि मोदी भेट होण्याची शक्यता आहे. आशिया खंडातील चीनचा प्रभाव मोडीत काढून भारत स्वतःचे स्थान निर्माण करत असल्याची भावना अमेरिकेतील तज्ज्ञ मंडळीची आहे. गेल्या काही महिन्यांत विविध देशांच्या प्रमुखांनी, प्रतिनिधींनी अमेरिकेचा दौरा केला असून यावेळी जो बायडेन आणि ट्रम्प यांची भेट घेतली. ५ नोव्हेंबर रोजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या २१ ते २३ सप्टेंबर या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याची घोषणा केली. यानुसार मोदी अध्यक्ष जो बायडेन यांच्या मूळ गावी म्हणजेच विल्मिंग्टन, डेलावेअर येथे जाणार आहेत. येथे क्वाड राष्ट्रप्रमुखांची परिषद होत आहे. या परिषदेला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानी, जपानचे पंतप्रधान किशिदा फ्युमिओ उपस्थित राहणार आहेत. यानंतर मोदी न्यूयॉर्कला जातील आणि २२ सप्टेंबर रोजी लाँग आयलंडमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करतील. दुसऱ्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील परिषदेत जागतिक नेत्यांना संबोधित करतील. वृत्तसंंस्था
मोदींनी केला होता ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
ट्रम्प यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून हल्ल्याचा निषेध केला होता. मोदी म्हणाले होते की, माझे मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. मी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राजकारण व लोकशाहीत हिंसेला थारा नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन. आम्ही या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.