संग्रहित छायाचित्र
हमासचा नेता याह्या सिनवार गेल्या काही काळापासून बेपत्ता असून त्याचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. यामुळे इस्राएलच्या लष्करी गुप्तचर विभागाने हमास नेता याह्या सिनवारचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
याह्या सिनवार बेपत्ता असल्याने गाझावरील हल्ल्यात तो मारला गेल्याची शक्यता तपासली जात आहे. सिनवारच्या मृत्यूबाबत अद्याप कोणते पुरावे मिळालेले नाहीत. तथापि, अनेक इस्राएली प्रसारमाध्यमे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत आहेत.
इस्राएलच्या लष्कराच्या माहितीनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वी गाझातील एका शाळेवर हल्ला केला होता. तेथे हमासचे कमांड सेंटर होते. या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला होता. कदाचित याह्या या हल्ल्यात मारला गेला असावा अशी शक्यता आहे. इस्राएलने अलीकडेच गाझामधील बोगद्यांवर हल्ला केला होता. तेथे सिनवार लपला असल्याचे मानले जात होते. मात्र, आतापर्यंत या हल्ल्यात सिनवार ठार झाल्याचा पुरावा हाती लागलेला नाही. सिनवार गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेक वेळा तो काही काळ गायब झाल्यानंतर युद्धविराम किंवा अन्य काही घटनांनंतर तो परतला होता. त्यातच इस्राएलची अंतर्गत सुरक्षा संस्था शिन बेटने सिनवारच्या मृत्यूच्या अटकळी फेटाळून लावल्या आहेत.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राएलवर झालेल्या हल्ल्याचे तीन महत्त्वाचे सूत्रधार होते. यामध्ये राजनैतिक प्रमुख इस्माइल हनियेह, लष्कर प्रमुख मोहम्मद दाईफ आणि गाझामधील हमास नेता याह्या सिनवार यांचा समावेश होता. ३१ जुलै रोजी इराणमधील हनियेहच्या मृत्यूनंतर, सिनवार हा प्रमुख बनला. १३ जुलैच्या हवाई हल्ल्यात हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ मारला गेला, याची पुष्टी १ ऑगस्टला झाली. अशा परिस्थितीत हमासच्या सर्वोच्च नेतृत्वात आता फक्त सिनवार उरला आहे. त्यामुळे इस्राएलचे संपूर्ण लक्ष सिनवारला शोधण्यावर आहे.
सिनवार हा गाझामधील हमासचा नेता आहे. तो इस्राएलमधील मोस्ट वॉन्टेड लोकांपैकी एक आहे. ६१ वर्षीय सिनवारला लोक अबू इब्राहिम या नावानेही ओळखतात. त्याचा जन्म गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस निर्वासित छावणीत झाला. याह्याचे आई-वडील अश्केलॉनचे होते. १९४८ मध्ये इस्राएलची स्थापना झाली आणि हजारो पॅलेस्टिनींना त्यांच्या मातृभूमीतून हाकलण्यात आले तेव्हा याह्याचे पालक निर्वासित झाले. पॅलेस्टिनी लोक या दिवसाला 'अल-नकबा' म्हणजेच विनाशाचा दिवस म्हणतात.याह्या सिनवारला सर्वप्रथम इस्राएलने १९८२ मध्ये अटक केली होती. त्यावेळी त्याचे वय १९ वर्षे होते. याह्यावर इस्लामी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. १९८५ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. याच सुमारास याह्याने हमास संस्थापक शेख अहमद यासिन यांचा विश्वास जिंकला. १९८७ मध्ये हमासची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षांनी याह्याने आपली कुख्यात अंतर्गत सुरक्षा संघटना अल-मजदची स्थापना केली. तेव्हा तो २५ वर्षांचा होता.