बीजिंग : चीनने नव्याने बनवलेली आण्विक पाणबुडी मे किंवा जून दरम्यान वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये समुद्रात बुडाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उपग्रह प्रतिमेद्वारे प्रकाशात आली आहे.
बुडालेली पाणबुडी झाऊ वर्गातील आणि अणुऊर्जेवर चालणारी होती. पाणबुडीचा अपघात लपवण्याचा चिनी अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केल्याने खुलासा करण्यास विलंब झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने यावर भाष्य करण्यास नकार दिला असून याबाबत आपणाकडे संबंधित कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१० मार्च रोजी उपग्रह प्रतिमेत वुहानजवळील शिपयार्डमध्ये झाऊ श्रेणीतील ही आण्विक पाणबुडी दिसली. ही पाणबुडी तिच्या लांब शेपटीने ओळखली जाते. यानंतर १६ मे रोजी प्लॅनेट लॅबच्या सॅटेलाइट इमेजमध्येही ती दिसली. जूनच्या उत्तरार्धात येथे अधिक छायाचित्रे घेतली होती. त्या छायाचित्रात ती दिसली नाही. उपग्रह प्रतिमेवर संशोधन करणारे टॉम शुगार्ट यांनी सर्वप्रथम ही माहिती दिली. यानंतर वॉल स्ट्रीट जर्नलने यावर एक वृत्त प्रकाशित केले.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार पाणबुडी वाचवण्यात आली असली तरी ती पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी काही महिने लागतील असे मानले जाते. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) नेही या घटनेला अद्याप दुजोरा दिलेला नाही. अमेरिकन अधिका-याने सांगितले की, ही पाणबुडी कशामुळे बुडाली हे सांगता येत नाही. ती बुडाली तेव्हा त्यात अणुइंधन होते की नाही हेही माहीत नाही. या अपघातात जीवितहानी झाली की नाही याचीही कल्पना नाही.
एका अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, चीनचे संरक्षणक्षेत्र भ्रष्टाचाराने बुडाले आहे. या घटनेमुळे पीएलएच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीजिंगसाठी ही घटना लाजिरवाणी आहे. आपल्या नौदलाचा विस्तार करताना सुरक्षेचा विचार विसरलेले दिसतात. चीनच्या लष्करी तयारीबाबतच्या २०२३ च्या अहवालानुसार चीनकडे ६ आण्विक इंधनावरील क्षेपणास्त्र मारा करणाऱ्या पाणबुड्या आहेत. तसेच ६ परमाणु इंधनावर चालणाऱ्या आणि ४८ डिझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या आहेत. आण्विक पाणबुड्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि केवळ हल्ला करणाऱ्या अशा दोन प्रकारच्या असतात. बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या अधिक शक्तिशाली आणि मारक क्षमतेच्या असतात.
अमेरिकेकडे ५३ जलद हल्ला, १४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, आणि चार गाइडेड क्षेपणास्त्र पाणबुड्या आहेत. अमेरिकेचा संपूर्ण पाणबुडीचा ताफा अणुऊर्जेवर चालतो. चीनला आपल्या पाणबुड्यांची संख्या २०२५ पर्यंत ६५ आणि २०३५ पर्यंत ८० एवढी वाढवायची आहे. चीनकडे ३७० हून अधिक जहाजे असलेले जगातील सर्वात मोठे नौदल आहे.