संग्रहित छायाचित्र
कॅनबेरा: चीनसोबतचा 'डिसएंगेजमेंट चॅप्टर' आता संपला आहे. असे विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत चीन सीमाप्रश्नावर मंगळवार (दि.५) रोजी केली. सध्या दोन्ही देशांच्या सैन्याने डेपसांग आणि डेमचोक या वादग्रस्त भागातील सीमारेषवरून माघार घेण्याचे काम पूर्ण केले आहे. दोन्ही देशात असणारा तणाव आता निवळणार आहे. आता प्रकरण खूप पुढे गेले आहे. ते कॅनबेरा येथे आयोजित भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा १५ वा फ्रेमवर्क संवाद निमित्त पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर बोलत असताना. जयशंकर म्हणाले- डिसएंगेजमेंट पूर्ण झाल्यानंतर आता दोन्ही देशांचे लक्ष तणावमुक्तीवर असेल. यासाठी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (एनएसए) लवकरच बैठक होणार आहे. जयशंकर यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केला नाही.
सैनिकांची संख्या कमी करण्याचे आव्हान
पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, 'सीमेवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आमच्यासमोर इतर आव्हाने असतील. ते म्हणाले की या आव्हानांमध्ये दोन्ही बाजूंच्या सैन्याची संख्या कमी करणे देखील समाविष्ट आहे.
जयशंकर म्हणाले- ब्रिक्स बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांनी त्यांचे परराष्ट्र मंत्री आणि एनएसए यांच्यातील बैठकीला सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांमधील संबंध आपल्या लोकांसाठी, जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे पीएम मोदी म्हणाले होते.
काय आहे मॅकमोहन रेषा
भारताची चीनशी ३ हजार ४४० किमी लांबीची सीमा आहे. या सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. २०२० मध्ये दोन्ही देशांमधील सीमा तणाव सुरू झाला. यादरम्यान, पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेल्या दशकातील गंभीर चकमक झाली. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. अनेक चिनी सैनिकही मारले गेले. मात्र, चीनने अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही.
भारत आणि चीनमध्ये ४ मोठे लष्करी संघर्ष
जून २०२०, गलवान व्हॅली संघर्ष: ४५ वर्षांतील पहिला संघर्ष ज्यात सैनिकांना प्राण गमवावे लागले. 20 भारतीय जवान शहीद झाले. जानेवारी २०२१, सिक्कीम संघर्ष: नाथू-ला-पासजवळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली ज्यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. सप्टेंबर २०२१, पँगॉन्ग गोळीबार: दोन्ही बाजूंनी इशारा म्हणून गोळीबार करण्यात आला. हे १९९६ च्या 'नो फायरआर्म्स' कराराचे उल्लंघन होते. डिसेंबर २०२१२, तवांग संघर्ष: अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरजवळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली.
तत्पूर्वी, भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने ट्विटरवर लिहिले की, 'चीन आणि भारतीय सैन्य दोन्ही बाजूंनी सीमा मुद्द्यांवर झालेल्या कराराची अंमलबजावणी करत आहेत. ते सध्या सुरळीत सुरू आहे. तसेच, भारतातील चीनचे राजदूत झू फीहाँग म्हणाले की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध प्रगतीपथावर येतील अशी आशा आहे. ते कोणत्याही विशिष्ट मतभेदाने प्रभावित होणार नाहीत.