संग्रहित छायाचित्र
बीजिंग: भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ अंतर्गत सॉफ्ट लॅंडिंग करून अनोखा विक्रम केला होता. आता चीनने 'चँग-६ प्रोब' (Chang-6 Prob) यानातून नुकतीच चंद्राच्या अंधाऱ्या भागातूनच दोन किलो माती आणून नवा इतिहास घडवला आहे. ही माती ४अब्ज वर्षे जुनी असल्याचे म्हटले जात आहे. चंद्रावरून माती आणण्याची मोहीम सोपी नव्हती. चीनने ही माती ड्रिलिंग आणि रोबोटिक आर्म्सद्वारे गोळा केली होती. त्यानंतर ही माती एका मोठ्या कॅप्सूलमध्ये टाकून री-एंट्री व्हेईकलच्या मदतीने पृथ्वीवर आणण्यात यश मिळविले होते.
चंद्रावरून आणलेली माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आपल्याला चंद्राची जी बाजू नेहमी दिसते तेथील ही माती नसून चंद्राच्या कधीही न दिसलेल्या भागातील ही माती आहे. चंद्राचा तो भाग, जो पृथ्वीवरून कधीही दिसत नाही. चंद्रावर जाणारे अंतराळवीर पृथ्वीवरून दिसणाऱ्या भागातच उतरतात. परंतु चंद्राचा न दिसणाऱ्या भागात अनेक रहस्य लपलेली आहेत. या भागाबद्दल फारच कमी माहिती मानवाला झाली आहे. चंद्रावर पाणी बर्फाच्या रूपात साठवलेले असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. चंद्रावर जर पाणी असल्याचे सिद्ध झाल्यास चंद्रावरही जीवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता चीनला या मातीचे परीक्षण करून चंद्राच्या डार्क बाजूला बर्फ आहे का ? हे शोधायचे आहे. याशिवाय चीन या मातीच्या अभ्यासातून चंद्राची निर्मिती नेमकी कशी आहे? चंद्र तयार कसा झाला आणि त्याचा भौगोलिक इतिहास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे संशोधन खूप महत्त्वाचे ठरू शकते. चीनने एक रोबोट तयार केला असून ज्याचे नाव आहे ‘चायनीज सुपर मेशन’. हा रोबोट चंद्राच्या मातीपासून विटा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर भविष्यात चीन चंद्रावर काही बांधकाम करण्याची शक्यता आहे.
चीनचे मिशन २०३०
चीन आणि रशिया यांनी साल २०२१ मध्ये चंद्रावर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र बांधण्याचा करार केला आहे. चीन रशियाच्या मदतीने साल २०३० पर्यंत चंद्रावर अणुप्रकल्प उभारणार आहे. चंद्रावरून माती आणणे हे चीनचे त्याच दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे मानले जाते. रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी म्हटले आहे की, चंद्रावर अणुप्रकल्प उभारणे हे सोपे काम नाही. या कामासाठी चंद्रावर मानव पाठवले जाणार नाहीत, तर हा प्लांट केवळ मशिनच्या साहाय्याने बांधला जाणार आहे. चीन २०३०-२०३३ पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचा विचार करीत आहे.