सत्तेवर आल्यास स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याची मोहीम

अमेरिकेचा नवा अध्यक्ष निवडण्याची वेळ जवळ येत असून त्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादाचा नवा ज्वर निर्माण करण्याचा भाग म्हणून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण सत्तेवर आलो तर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची सर्वात मोठी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 10 Aug 2023
  • 12:07 pm
सत्तेवर आल्यास स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याची मोहीम

सत्तेवर आल्यास स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याची मोहीम

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांची समर्थकांच्या मेळाव्यात घोषणा

#वॉशिंग्टन

अमेरिकेचा नवा अध्यक्ष निवडण्याची वेळ जवळ येत असून त्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादाचा नवा ज्वर निर्माण करण्याचा भाग म्हणून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण सत्तेवर आलो तर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची सर्वात मोठी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प न्यू हॅम्पशायर शहरातील समर्थक मेळाव्याला संबोधित करत होते.   

ट्रम्प म्हणाले की, अध्यक्षपदी निवडून आल्यास, मी आपल्या हाती असलेले सर्व कायदेशीर अधिकार आणि मनुष्यबळाचा वापर करून अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची मोहीम हाती घेईल. ही मोहीम हाती घेताना सर्व राज्ये, स्थानिक, फेडरल आणि लष्करी मनुष्यबळाचा वापर केला जाईल. न्यू हॅम्पशायरमधील मेळाव्यात ट्रम्प यांनी अमेरिकेतील लोकांसाठी बलिदान दिल्याचे सांगितले. ट्रम्प म्हणाले की, तुमच्यासाठी माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यांना स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे आहे. मात्र, मी त्यांना तुमचे स्वातंत्र्य कधीही हिरावून घेऊ देणार नाही. त्यांना मला गप्प करायचे आहे. मात्र, मी त्यांना तुम्हाला गप्प करू देणार नाही.

ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अशी मोहीम हाती घेण्याचा उल्लेख केला आहे. यापूर्वी ५ मार्च रोजी त्यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणारे स्थलांतरित आणि बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवरून होणाऱ्या स्थलांतराचा उल्लेख केला होता. त्यावेळीही विदेशी स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याची भाषा केली होती. ते म्हणाले होते की, गेल्या वर्षी अमेरिका-मेक्सिको सीमेवरून लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांनी अमेरिकेत प्रवेश केला. ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ मध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी मेक्सिको सीमेवर विक्रमी २२ लाख स्थलांतरितांना पकडले. परप्रांतीयांना रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाचे हे अपयशी धोरण कारणीभूत आहे. अन्य एका परिषदेत ट्रम्प म्हणाले होते की, आम्ही सीमेवर स्थलांतरासंबंधित अधिकारी तैनात करू. प्रत्येक बेकायदेशीर स्थलांतरितांचा शोध घेऊन त्यांना परत पाठवू. सीमेवर भिंत बांधू. बेकायदेशीर स्थलांतर हा नेहमीच ट्रम्प यांच्या प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. ट्रम्प यांनी २०१६ च्या निवडणूक प्रचारातही हाच मुद्दा उपस्थित केला होता.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest