संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: वाढती गुन्हेगारी, दहशतवादामुळे अमेरिकी नागरिकांनी भारतातील मणिपूर, जम्मू-काश्मीर, भारत-पाकिस्तान सीमावर्ती आणि नक्षलग्रस्त भागाला भेट देणे टाळावे, असा सल्ला बायडेन प्रशासनाने दिला आहे. भारतासाठी सुधारित प्रवास सल्ला देताना अमेरिकेचा परराष्ट्र विभाग म्हणतो की, भारतातील काही भागांत जास्त धोका आहे. गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे तेथे भेट देताना अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.
अमेरिकेने सुरक्षेबाबत भारताला २ ऱ्या पातळीवर ठेवले आहे. देशाच्या अनेक भागांना ४ थ्या पातळीवर ठेवले आहे. प्रवासाबाबतच्या सल्ल्यांमध्ये म्हटले आहे की, भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बलात्कार हा देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक आहे.
भारतातील अनेक पर्यटन स्थळांवर बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दहशतवादी कोणत्याही इशाऱ्याशिवाय भारतात हल्ला करू शकतात. ते पर्यटन स्थळे, स्थानके, बस स्टँड, बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि सरकारी इमारतींना लक्ष्य करतात. भारताच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मदत पुरवण्यात अमेरिकेच्या सरकारला अडचणी येऊ शकतात.
मणिपूरला ४ थ्या पातळीवर ठेवले असून हिंसाचार, गुन्हेगारीमुळे येथे प्रवास करू नये असा विशेष सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, मणिपूरमध्ये जातीय संघर्षामुळे हिंसाचार आणि स्थलांतराच्या बातम्या वाढत आहेत. मणिपूरमधील सरकारी तळांवर हल्ले होत असून भारतात जाणाऱ्या अमेरिकी अधिकाऱ्यांनाही मणिपूरला जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. तसेच लडाख वगळता जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. काश्मीर खोऱ्यात आणि सीमावर्ती भागात ही नित्याची स्थिती आहे.
यामध्ये नक्षली समस्येचाही उल्लेख करण्यात आला आहे. भारतातील मोठ्या भागात नक्षलवादी सक्रिय असल्याचे म्हटले आहे. नक्षली महाराष्ट्रापासून तेलंगणा, पश्चिम बंगालपर्यंत पसरलेले आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशाच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड आणि झारखंडच्या ग्रामीण भागात भारतीय अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. या भागांमध्ये प्रवास करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.