जर्मनीतील पाक दूतावासावर अफगाणी नागरिकांचा हल्ला

जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये असलेल्या पाकिस्तान दूतावासावर अफगाणी नागरिकांनी जोरदार हल्ला चढवला असून यावेळी पाकिस्तानचा झेंडा खाली खेचण्यात आला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संतापलेल्या अफगाणी पश्तून नागरिकांनी हा हल्ला चढवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 23 Jul 2024
  • 12:22 pm
world news, Afghan citizens, attacked, Pakistani embassy, Germany, Pakhtunkhwa province

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय ध्वज खाली खेचला, पाकिस्तानकडून जर्मनीचा निषेध

बर्लिन : जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये असलेल्या पाकिस्तान दूतावासावर अफगाणी नागरिकांनी जोरदार हल्ला चढवला असून यावेळी पाकिस्तानचा झेंडा खाली खेचण्यात आला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संतापलेल्या अफगाणी पश्तून नागरिकांनी हा हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने घटनेचा तीव्र निषेध नोंदवत हे जर्मनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे अपयश असल्याचे म्हटले आहे.

पश्तून तहफ्फुज मूव्हमेंट अर्थात पीटीएमचे वरिष्ठ सदस्य आणि प्रसिद्ध कवी गिलामन वजीर यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. वजीर यांच्यावर ७ जुलै रोजी हल्ला करण्यात आला. त्यामुळे पश्तून नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. यातूनच पाकिस्तानच्या दूतावासावर हल्ला झाल्याचे समजते. अफगाणी नागरिकांनी पाकिस्तानी दूतावासाच्या आवारात प्रवेश केला. तसंच पाकिस्तानचा राष्ट्रीय झेंडा सगळ्यांनी हटवला. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसंच आमच्या कर्मचाऱ्यांचा जीव आता धोक्यात आला आहे, असं पाकिस्तानने जर्मनीला सुनावलं आहे. पाकिस्तानच्या विरोधकांनी आमच्या दूतावासावर हल्ला केला. यावेळी त्यांना रोखण्यात जर्मनीचे अधिकारी कमी पडले. १९६३ च्या नियमानुसार दूतावासाची सुरक्षा करणं ही त्या-त्या देशाची जबाबदारी असते. जर्मन सरकारने या घटनेत हयगय केली. आता १९६३ च्या नियमानुसार आणि करारानुसार आमचं त्यांना हे आवाहन आहे की, जर्मनीने आता पाकिस्तान दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. त्याबद्दल आम्हाला खात्री द्यावी की त्यांच्या जिवाला काही होणार नाही. जर्मनी सरकारने लवकरात लवकर हिंसा करणाऱ्यांना अटक करण्यासाठी योग्य पावलं उचलावीत. सुरक्षेत ज्यांनी चूक केली त्यांची बाजू मागवावी असेही पाकिस्तानने म्हटलं आहे.

व्हीडीओ आणि माध्यमांच्या माहितीनुसार, जे आंदोलक होते त्यांनी पाकिस्तानी दूतावासात प्रवेश केला. तसंच त्यांनी दगडफेकही केली. पाकिस्तानचा झेंडा खाली खेचला आणि तो जाळण्याचाही प्रयत्न केला. साधारण १० हून अधिक जणांच्या जमावाने हा हल्ला केला. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. पाकिस्तानच्या दूतावासावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest