संग्रहित छायाचित्र
मॉस्को: रशिया-युक्रेन युद्धाला अडीच वर्षे झाल्याने रशियाला सैनिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्या जवानांना भरतीपूर्वीच १८ लाखांची ऑफर दिली जात आहे.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हणतात की, नागरिकांना सैन्यात सामील होण्यासाठी १.९ दशलक्ष रूबल (अंदाजे रु. १८ लाख ४१ हजार ६९७) सुरुवातीला देण्यात येतील. रुजू झाल्यानंतर पहिल्या वर्षी ४९ लाख पगार मिळेल. युद्धात जखमी झाल्यास उपचारासाठी ४ ते ९ लाख रोख दिले जातील. शहीद झाल्यास कुटुंबाला २८ लाख दिले जातील.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने १२ जुलै रोजी म्हटले होते की, मे ते जून दरम्यान युक्रेन युद्धात ७० हजारांहून अधिक सैनिक मारले गेले, किंवा जखमी झाले. यातील बहुतेकांचा मृत्यू युक्रेनमधील खार्किव येथे झाला. सीएनएनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यूएस काँग्रेसला दिलेल्या गुप्त माहितीचा हवाला देत म्हटले आहे की, युद्धाच्या सुरुवातीला रशियाने आपले ८७ टक्के सैन्य आणि दोन तृतीयांश रणगाडे गमावले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डिसेंबरमध्ये सैनिकांची संख्या १ लाख ७० हजारांनी वाढवण्याचे सूतोवाच केले होते. रशियाला सैन्यात २२ लाखांहून अधिक सैनिक हवे आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धानंतर रशियाने सैन्यात १५ टक्के वाढ केली आहे. रशियाने १५ हजार नेपाळींची भरती केली आहे. एका नेपाळी सैनिकाने सांगितले की, सध्या अफगाणिस्तान, भारत, काँगो आणि इजिप्तमधील तरुण प्रशिक्षण घेत आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. नाटोमध्ये सामील होण्याच्या आग्रहामुळे व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला होता. पुतिन यांनी युद्धाला लष्करी कारवाई म्हटले आहे. युद्धामुळे आतापर्यंत ४० लाखांहून अधिक युक्रेनियन नागरिकांना देश सोडावा लागला आहे. हे लोक इतर देशांमध्ये निर्वासितांसारखे जगत आहेत. देशातच ६५ लाखांहून अधिक युक्रेनियन बेघर झाले आहेत.