ओसंडून वाहतोय हिंदूंबद्दलचा कळवळा
लंडन: ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षासह मजूर पक्षालाही इंग्लंडमधील हिंदू समुदायाचा कळवळा आला आहे. प्रत्येक पक्षाचे नेते हिंदू मंदिरांना भेटी देत सुटले आहेत. आपणही श्रद्धावाण आहोत असे दाखवत मतदारांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा तिथे सुरू झाली आहे. प्रारंभी मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर यांनी लंडनमधील एका मंदिराला भेट दिली. त्यानंतर ऋषी सुनक यांनी स्वामीनारायण मंदिरात जाऊन पूजा केली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे हिंदू धर्माबद्दल नेहमीच आग्रही असतात. हिंदू मंदिरांना भेटी देणे, हिंदू धर्मातील तत्त्वे अंगीकारणे आदी गोष्टींमुळे ऋषी सुनक नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी लंडनमधील एका मंदिराला भेट दिली. संसद सदस्य म्हणून मी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्याचा अभिमान असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे. तसेच धर्मामुळे मला प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले आहेत. या भेटीत ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही त्यांच्याबरोबर होत्या. ब्रिटनमध्ये लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यानी लंडनच्या श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. या भेटीत सुनक यांनी उपासकांना संबोधित केले आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या दृष्टिकोनातील मार्गदर्शक तत्त्व म्हणून धर्माबद्दल ते बोलले. ते म्हणाले की, मी एक हिंदू आहे आणि तुमच्या सर्वांप्रमाणेच मला माझ्या (हिंदू धर्मावरील) विश्वासातून प्रेरणा आणि दिलासा मिळतो. आपली श्रद्धा आपल्याला आपले कर्तव्य करण्यास शिकवते आणि जोपर्यंत कोणी ते निष्ठेने करतं तोपर्यंत परिणामाबद्दल घाबरू नये. माझ्या प्रेरणेने मला हेच मानायला शिकवले आहे. मी माझे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि तेच मला माझ्या मुलींना द्यायचे आहे, जे मला सार्वजनिक सेवेसाठी मार्गदर्शन करते, असेही ते म्हणाले.
ओपिनियन पोलचा कल मजूर पक्षाकडे
ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान सुनक यांनी २२ मे रोजी त्यांच्या १० डाउनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानावरून याची घोषणा केली होती. पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक पहिल्यांदाच निवडणुकीत मतदारांसमोर जाणार आहेत. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान चेहरा जाहीर केला नव्हता. यावेळी त्यांनी सुनक यांनाच पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर केले आहे. ४४ वर्षीय ऋषी सुनक हे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. जानेवारी २०२५ मध्ये येथे सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता होती. निवडणूक जाहीर करण्यासाठी सुनक यांच्याकडे डिसेंबरपर्यंतचा वेळ होता, मात्र त्यांनी ७ महिने अगोदर घोषणा केली. निवडणुकीत सुनक यांचा सामना मजूर पक्षाचे नेते केयर स्टार्मर यांच्याशी आहे. स्टार्मर हे इंग्लंडमधील एप्रिल २०२० पासून मजूर पक्षाचे नेते आहेत. अनेक ओपिनियन पोलमध्ये मजूर पक्ष आघाडीवर राहील, असा कौल देण्यात आलेला आहे.
...तर मी अकाऊंटंट झालो असतो !
या मंदिरात ऋषी सुनक यांनी काही वेळ घालवला. त्यांनी पुजाऱ्यांशी संवाद साधला. हिंदू समाजातील मुलांनी आता फक्त डॉक्टर, वकील, अकाऊंटंट होणे पुरेसे नाही, असे पुजाऱ्यांनी म्हणताच ऋषी सुनक म्हणाले, आता माझे आई-वडील इथे असते आणि तुम्ही त्यांना असे विचारले असते तर कदाचित ते तुम्हाला म्हणाले असते की, मी डॉक्टर, वकील किंवा अकाऊंटंट झालो असतो तर त्यांना ते आवडले असते.
मजूर पक्षाचे नेते स्टार्मर यांनीही केली पूजा
सुनक यांच्या एक दिवस आधी विरोधी पक्षनेते आणि मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर हेही लंडनमधील एका मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी अनेक मुलांशी संवाद साधला आणि पूजेतही सहभाग घेतला. त्यांनीही परमेश्वराच्या मूर्तीवर जल अर्पण केले. स्टार्मर यांनी आपल्या भाषणात किंग्सबरी मंदिराचे वर्णन 'करुणेचे प्रतीक' म्हणून केले. स्टार्मर म्हणाले होते की, जर त्यांनी निवडणूक जिंकली तर त्यांचे सरकार ब्रिटिश भारतीय समुदायासाठी काम करतील. ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला स्थान नाही. देशाचे तुकडे करणे किंवा धर्माच्या आधारे दुही निर्माण करणारे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही. सर केयर स्टार्मर स्वतःला काहीसे अँग्लिकन म्हणून वर्णन करतात. बायबलच्या आधारे ख्रिस्ती धर्माचे पालन करणारा हा समुदाय आहे. जरी स्टार्मर स्वतःला धार्मिक मानत नाहीत. सत्तेत आल्यास सर्व धर्माच्या नेत्यांसोबत एकत्र काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.