संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण निवडणुकीत पराभूत झालो तर देशात मोठा रक्तपात होईल, अशी जाहीर धमकी दिली आहे. एका सभेला संबोधित करताना त्यांनी थेट रक्तपाताची धमकी दिल्याने खळबळ माजली आहे. सभेत ते म्हणाले की, 'नोव्हेंबर महिन्यामध्ये देशातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक होत आहे. यावेळी ते अध्यक्ष झाले नाहीत तर देशात हिंसाचार माजेल, रक्तपात होईल.
ओहिओमध्ये सिनेटरपदाचे उमदेवार बार्नी मोरेनो यांच्या प्रचारसभेत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. ट्रम्प ऑटो इंडस्ट्रीच्या संदर्भात बोलत होते. यावेळी त्यांनी रक्तपाताचा उल्लेख केला. ते म्हणाले की, तुम्ही या वर्षाची ५ नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्रपती जो बायडेन सध्या सत्तेवर आहेत.
चीनची मेक्सिकोमध्ये कार बनवण्याची योजना आहे. तसेच या कार अमेरिकेत विकण्याचा त्यांचा इरादा आहे. मी जर अध्यक्ष झालो तर, असे होऊ देणार नाही. चीनचे धोरण हाणून पाडू. त्यांना त्यांच्या कार अमेरिकेत विकता येणार नाहीत. मी जर जिंकलो नाही तर सर्व देशामध्ये रक्तपात होईल. बायडेन यांचा सत्तेवरील कार्यकाळ देशाच्या दृष्टीने सर्वाधिक भयानक काळ आहे. त्यांची इमिग्रेशन पॉलिसी चुकीची आहे.
अमेरिकेचा अपमान : बायडेन
ट्रम्प यांच्या जाहीर धमकीनंतर जो बायडेन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे देशाचा अपमान करत आहेत. देशाची प्रतिमा त्यांच्यामुळे खराब होत आहे. यावेळच्या निवडणुकीत अमेरिकेच्या लोकशाहीचे भाग्य ठरणार आहे. ६ जानेवारीची घटना लक्षात घेता ट्रम्प किती घातक आहेत हे लक्षात येईल. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. दोघांमध्ये थेट निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहेत. ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प आणि ८१ वर्षीय जो बायडेन यांच्यामध्ये कोण विजयी होईल, याबाबत उत्सुकता आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सर्वात वयस्कर उमेदवार अध्यक्षपदासाठी समोरासमोर आले आहेत.