संग्रहित छायाचित्र
ढाका : बांगलादेशातील आंदोलकांनी १९७१ च्या युद्धातील भारताच्या विजयाचे स्मारक पाडून टाकले आहे. हे राष्ट्रीय स्मारक मुजीबनगरमध्ये होते. स्मारक भारत आणि बांगलादेशातील मुक्तीवाहिनीच्या विजयाचे तसेच पाकिस्तानी लष्कराच्या पराभवाचे प्रतीक होते.
१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल एएके नियाझी यांनी हजारो सैनिकांसह भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. दरम्यान, देशातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून संपावर गेलेले बहुतेक पोलीस कामावर परतले आहेत.
त्यावेळी नियाझी यांनी भारतीय लष्कराचे ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट-जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. त्यांची प्रतिमा या स्मारकात कोरलेली आहे. दरम्यान, बांगलादेशातील अंतरिम सरकारने शेख हसीना यांना परत मायदेशी येण्यास सांगितले आहे. अंतरिम सरकारमध्ये गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे ब्रिगेडियर जनरल एम सखावत यांनी हसीना यांच्या पक्षाला नव्या चेहऱ्यांची गरज असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, हसीना यांना देशातून हाकलण्यात आले नव्हते. त्या स्वतः देश सोडून निघून गेल्या आहेत. देशातील परिस्थिती पुन्हा बिघडू नये, म्हणून त्या परत येऊ शकतात.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे हिंदू विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. हिंदू विद्यार्थी अल्पसंख्याक हक्क आंदोलन गट युनूस सरकारपुढे आपल्या आठ मागण्या मांडणार आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर हिंदू समुदायावरील हल्ल्यांशी संबंधित २०५ घटनांची नोंद झाली आहे.
बांगलादेशात अजूनही अस्थिरतेचे वातावरण असून ॲटर्नी जनरल कार्यालयातील ७० सरकारी वकिलांनी सोमवारी राजीनामा दिला. तेथे २१५ सरकारी वकील काम करत होते. यापूर्वी आंदोलकांनी सरन्यायाधीशांचा राजीनामा घेतला होता.
पोलीस कामावर
ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशातील आंदोलक पोलिसांनी संप मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे. अंतरिम सरकारच्या आश्वासनानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यापूर्वी पोलिसांनी जिवाला धोका असल्याचे कारण देत कर्तव्य बजावण्यास नकार दिला होता. तसेच ते संपावर गेले होते. पोलीस मुख्यालयाच्या माहितीनुसार रविवारपर्यंत देशभरातील ६३९ पैकी ५९९ पोलीस ठाण्यांमध्ये कामकाज पुन्हा सुरू झाले होते.
मोहम्मद युनूस निर्दोष
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची भ्रष्टाचाराशी संबंधित खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने युनूस यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल केला होता. बांगलादेशात अलीकडेच अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. त्याच्या एक दिवस अगोदरच युनूस यांची कामगार कायद्यांच्या उल्लंघनाशी संबंधित खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. ग्रामीण टेलिकॉमचे अध्यक्ष असताना मोहम्मद युनूस यांच्यावर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. युनूस यांच्याशिवाय ग्रामीण दूरसंचार संचालक अश्रफुल हसन, मोहम्मद शाहजहान आणि विद्यमान अंतरिम सरकारच्या सदस्य नूरजहाँ बेगम यांच्यावरही कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. सरकारच्या सल्लागार असलेल्या नूरजहाँ बेगम यांचीही भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने ढाका न्यायालयात तक्रार दाखल केली होती. आता ती मागे घेतली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये सर्व आरोपींना २० हजारांच्या दंडासह ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय, जूनमध्ये, लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने युनूस आणि इतर १३ लोकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर ग्रामीण दूरसंचार कर्मचाऱ्यांच्या नफा निधीतून सुमारे १८ कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप होता. याच प्रकरणात युनूस यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, मोहम्मद युनूस खालेदा झिया यांचा पक्ष बीएनपीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. युनूस यांच्या घरी ही बैठक होणार आहे.