संग्रहित छायाचित्र
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी अज्ञात स्थळी आपल्या बहिणीसह त्यांनी रवाना झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले आहे. तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे.
शेख हसीना या भारताच्या दिशेनं रवाना झाल्याचं बोललं जात आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जात असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या निवासस्थानी हजारो आंदोलक घुसल्याचं पाहायला मिळालं.
बांगलादेशात जुलै महिन्यापासून आरक्षणविरोधी आंदोलन सुरू आहे. सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला होता. तरीही आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. १९७१ साली बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या लढ्यात ज्या लोकांनी योगदान दिले होते, त्यांना आरक्षण दिले जात होते. त्यामुळे बांगलादेशात दोन गट निर्माण झाले होते. एका गटाने या आरक्षणाचे समर्थन केले तर दुसऱ्या गटाने त्याला विरोध करत हे आरक्षण आता बंद करावे अशी मागणी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला.
बांगलादेश लष्करप्रमुख वकार-उर-झमान यांनी पत्रकार परिषद शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार असून सर्वांना शांतता राखण्याचंआवाहन त्यांनी केलं आहे.