बांगलादेशात हिंदूंवर हल्ले, घरे आणि मंदिरांची तोडफोड, पैसे-दागिन्यांचीही लूट

ढाका: बांगलादेशात हिंसाचार माजला असून अद्यापही जाळपोळ, तोडफोड सुरू आहे. समाजकंटकांनी अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे. बांग्लादेशात हिंदुंना टार्गेट केले जात आहे. जमाव निवडून-निवडून हिंदुंना टार्गेट करत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 7 Aug 2024
  • 03:38 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अल्पसंख्याक समूह दहशतीखाली

ढाका: बांगलादेशात हिंसाचार माजला असून अद्यापही जाळपोळ, तोडफोड सुरू आहे. समाजकंटकांनी अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे. बांग्लादेशात हिंदुंना टार्गेट केले जात आहे.  जमाव निवडून-निवडून हिंदुंना टार्गेट करत आहे. घरांना आगी लावल्या जात आहेत. दुकाने लुटली जात आहेत.  बांग्लादेशातील मेहरपुर येथील इस्कॉन मंदिराचे फोटो समोर आले आहेत. समाजकंटकांनी तोडफोड केल्यानंतर मंदिर पेटवून दिले.  

बांगलादेशातील १७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंच्या घरांना आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. महागडे सामान लुटण्यात आले आहे. मंदिरांवर हल्ले करण्यात आले. लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यात धार्मिक हिंदू कार्याशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घरी तोडफोड करून लूटमार करण्यात आली. दंगेखोरांनी नगरपालिका सदस्य मुहिन रॉय यांच्या कॉम्प्युटर दुकानात तोडफोड करून आग लावली. 

कालीगंज उपजिल्ह्यातील चंद्रपूर गावात ४ हिंदू कुटुंबांच्या घरात तोडफोड आणि लूटमार करण्यात आली. हातिबंधा उपजिल्हा पुरबो सरदुबी गावात १२ हिंदूंची घरे पेटवून देण्यात आली. बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचगढमध्ये अनेक हिंदू घरांमध्ये तोडफोड आणि लूटमार करण्यात आली.

देशात असा कुठला जिल्हा नाही जिथे हिंदूंच्या घरांवर हल्ला झालेला नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातून हल्ल्याच्या बातम्या येत असल्याचे ओइक्या परिषदेचे महासचिव मोनिंद्र कुमार नाथ म्हणाले आहेत. हिंदूंना घरातून बाहेर काढून मारहाण करण्यात येत आहे. दुकाने लुटण्यात येत आहेत. या हल्ल्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू दहशतीखाली आला आहे. दिनाजपूर आणि इतर जिल्ह्यात १० हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले आहेत. हल्लेखोरांनी रेलबाजारहाट येथे एक मंदिरात तोडफोड केली. 

जमावाने हल्ले करण्याचे प्रमाण
बांगलादेशातील हिंदू-बुद्ध-ईसाई परिषदेचे सरचिटणीस उत्तम कुमार रॉय यांनी सांगितले की, खानसामा जिल्ह्यात तीन हिंदूंच्या घरावर हल्ला करण्यात आला. लक्ष्मीपूर येथे गौतम मजूमदार यांनी सांगितले की, सोमवारी (५ ऑगस्ट) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ३०० पेक्षा जास्त हल्लेखोरांनी त्यांच्या दोन मजली इमारतीला आग लावली.  बांगलादेशमधील हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी कॉन्सिलचे नेते काजोल देबनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आंदोलन भडकल्यानंतर बांगलादेशमधील हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले.

आरक्षणावरून बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन
बांगलादेशात आरक्षणासाठी उभारण्यात आलेले आंदोलन हिंसक झालंय.  या आंदोलनात सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी जीव गमावला आहे. आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेल्या आंदोलनाचा प्रवास सत्ता बदलापर्यंत झालाय. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होत भारतात पोहोचल्या. बांगलादेशात लष्कराच्या अधिपत्याखाली आता नवीन सरकार स्थापण्याची तयारी सुरू आहे.  लष्करप्रमुख  जनरल वकार-उज़-ज़मान यांच्या इशाऱ्यावरच नव्या सरकारचा कारभार चालणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest