संग्रहित छायाचित्र
ढाका : विद्यार्थी आंदोलनाला प्रक्षोभक, हिंसक वळण लागल्यावर पंतप्रधानपदाचा त्याग करून भारतात आलेल्या बांगलादेशच्या शेख हसीना आता नेमक्या कोठे आश्रय घेणार हे नक्की नाही. हसीना यांना भारताने आसरा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय विरोधक माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्या खालेदा झिया या नाराज झाल्या असून त्यांनी भारताला इशारा दिला आहे. जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत करत असाल तर उभय देशांतील परस्पर सहकार्याचा आदर करणे भविष्यात कठीण होईल, अशा शब्दात बीएनपीच्या नेत्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
देशात राजकीय उलथा-पालथ झाल्यापासून शेख हसीना भारतात आहेत. येथून त्या युरोप किंवा अमेरिकेत आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. शेख हसीना यांना भारताने आसरा दिल्याने खालेदा झिया यांचा पक्ष संतापला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते गयेश्वर रॉय हे म्हणाले, बांगलादेश आणि भारतातील परस्पर सहकार्याचे आमचा पक्ष समर्थन करतो. जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत करत असाल तर या सहकार्याचा आदर करणे आम्हाला कठीण होईल. तसेच शेख हसीना यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भारताने पाठिंबा दिल्याबद्दल आम्हाला चिंता वाटत असल्याचे रॉय म्हणाले.
भारत सध्या शेख हसीना यांची जबाबदारी उचलत आहे. भारत आणि बांगलादेशामधील लोकांचे एकमेकांशी वैर नाही. भारताने संपूर्ण देशापेक्षा एकाच पक्षाला (अवाली लीग) उचलून धरणे योग्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यापासून सोमवार, ५ ऑगस्टपासून भारतात आश्रय घेतला आहे. येथून पुढे त्या काय करणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या पाश्चात्य देशांत आश्रय मागू शकतात किंवा भारतातच राहू शकतात किंवा पुन्हा बांगलादेशमध्ये परतू शकतात. दरम्यान शेख हसीना यांचा मुलगा जीब वाजेद जॉयने भारताचे आभार मानले आहेत.
ते म्हणतात, माझ्या आईला संरक्षण दिल्याबद्दल आम्ही भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच बांगलादेशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे आम्हाला वाटते. तसेच इंग्लंड आणि अमेरिकेने शेख हसीना यांना व्हिसा नाकारला असल्याचा दावाही त्यांनी फेटाळला.