जपानमध्ये पुन्हा धरणीकंप

A 7.1 magnitude earthquake struck off the southern coast of Japan on Thursday. After this, Japanese systems have warned of tsunami in this area. According to Japan's government information broadcasting agency, a tsunami warning has been issued for the southern Japanese islands of Kyushu and Shikoku.

दक्षिण किनारपट्टी हादरली, ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप, हवामानशास्त्र विभागाकडून त्सुनामीचाही इशारा

#टोकियो

जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला गुरुवारी ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे. यानंतर जपानच्या यंत्रणांनी या भागात त्सुनामी येण्याचा इशारा दिला आहे. जपानच्या सरकारी माहिती प्रसारण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या दक्षिणेकडील क्युशू आणि शिकोकू या बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे.

जपानच्या हवामान संस्थेने आज पहिल्यांदा माहिती देताना सांगितले की, भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली होती. परंतु नंतरच्या अनुमानात सुधारणा करून भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल असल्याचे सांगितले गेले. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेटांना भूकंपाचा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. 

  तसेच या भूकंपाची खोली ३० किमीपर्यंत पसरल्याचेही हवामानशास्त्र संस्थेने सांगितले आहे. या अंदाजानुसार दक्षिणेकडील किनारपट्टीला जवळपास १ मीटरच्या लाटांची त्सुनामी धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार क्युशू बेटाजवळ २० सेंटिमीटर उंच लाटा पाहिल्या गेल्या आहेत. दरम्यान क्युशू आणि शिकोकू बेटांवर असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांना हानी पोहोचली आहे का? याची तपासणी प्रकल्प चालकांकडून केली जात आहे. कागोशिमा येथील प्रशासनाने सेंडाई अणुऊर्जा प्रकल्पात कोणताही बिघाड झाला नसल्याचे सांगितले आहे. या प्रकल्पातील काम नेहमीप्रमाणे चालू आहे. 

नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठा भूकंप

जपानची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी असल्याचे सांगितले जाते. जपान द्वीपसमूहावर दरवर्षी सुमारे १,५०० भूकंपाचे धक्के जाणवतात. त्यापैकी बरेचसे धक्के हे सौम्य स्वरूपाचे असतात. भूकंपाने होणारे नुकसान हे त्याचे स्थान आणि पृष्ठभागावरील वसाहतीनुसार बदलते. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये मोठा भूकंप झाला होता. ज्यामध्ये २६० लोक मरण पावले होते.

इमारत बांधण्यासाठी भूकंप नियमावली

ग्रेट कांटो भूंकप १९२३ मध्ये आला होता. त्यात टोकियोला मोठा फटका बसला होता. या अपघातानंतर जपानचा पहिला भूकंप प्रतिरोधक बिल्डिंग कोड तयार करण्यात आला. इमारतीत स्टील आणि काँक्रिटचा वापर सुरू झाला. लाकडी इमारतीसाठी जाड खांब अनिवार्य करण्यात आला. भूकंप आला की इमारतीसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येते. त्याआधारे बदल होतो.

‘रिंग ऑफ फायर’ म्हणजे नेमके काय?

जपानच्या भौगोलिक स्थानामुळे या देशातील बराचसा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. ज्यामुळे जपानला भूकंपानंतर त्सुनामीचा धोका असतो. जपान देश ‘रिंग ऑफ फायर’च्या प्रभाव क्षेत्रात वसलेला आहे. ‘रिंग ऑफ फायर‘ ही प्रशांत महासागराच्या सभोवताली असलेली ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणांची एक शृंखला आहे. हे क्षेत्र अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालीच्या आकारासारखे असून ४० हजार २५० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रालाच सर्कम-पॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे या भागात ४०० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारा तसेच जपान आणि न्यूझीलंडपर्यंत पसरला आहे.रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका या ठिकाणांचा समावेश होतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest