संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मंकी पॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. यामुळे देशात मंकी पॉक्सच्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे. मंकी पॉक्सचे पाचही रुग्ण परदेशातून विमानाने पाकिस्तानात आले होते.
कराची विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात आल्यावर हे रुग्ण आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दोन प्रवाशांचा संशय आल्याने त्यांची तपासणी केल्यावर यातील ५१ वर्षीय प्रवाशाला विषाणूची लागण झाल्याचे आढळले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
पाकिस्तानमध्ये मंकी पॉक्स विषाणूचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सर्व विमानतळांवर बाहेरून आलेल्या प्रवाशांवर पाळत ठेवली जात आहे. तसेच नागरिकांनी मंकी पॉक्सच्या प्रसाराची काळजी करू नये असे आवाहनही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पाकिस्तानात मंकी पॉक्सने एकाचा मृत्यू झाला होता.
जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट रोजी मंकी पॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. या आजाराला आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची दोन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. या विषाणूचा नवीन स्ट्रेन (क्लॅड-१) पूर्वीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त संसर्गजन्य असून त्याचा मृत्यूदरही जास्त आहे.
आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (आफ्रिका सीडीसी) या संघटनेच्या म्हणण्यानुसार या वर्षी आफ्रिकन खंडात आतापर्यंत १७ हजारांहून अधिक मंकी पॉक्सच्या संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. जगभरात आतापर्यंत ५१७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णांच्या संख्येत १६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.