संग्रहित छायाचित्र
ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एक तेलवाहू जहाज बुडाले असून जहाजावर १३ भारतीय आणि ३ श्रीलंकन असे १६ कर्मचारी होते. सोमवारी (१५ जुलै) जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून हे कर्मचारी बेपत्ता आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी याची माहिती दिली.
सुरक्षा केंद्राने असे सांगितले की, प्रेस्टीज फाल्कन नावाचे हे तेलवाहू जहाज दुबईच्या बंदरावरून निघाले होते. ओमानमधील येमेन एडन बंदराकडे येत असताना हा अपघात घडला. डुकम या ओमानमधील आणखी एका बंदराजवळ असलेल्या रास मद्राकाच्या शहरापासून आग्नेय दिशेला २५ सागरी मैल अंतरावर हे जहाज बुडाले. दोन दिवसांपासून जहाजावरील कर्मचाऱ्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे.
ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने असे सांगितले की, तेलवाहू जहाज बुडाल्यामुळे ते समुद्रावर उलटे तरंगत होते. हे जहाज पुन्हा सरळ केले गेले की नाही किंवा त्यातून तेलगळती झाली आहे की नाही, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
प्रेस्टीज फाल्कन हे जहाज २००७ मध्ये बांधलेले असून ते ११७ मीटर लांबीचे असल्याचे सांगितले जाते. कमी अंतरावर प्रवास करण्यासाठी हे छोटे जहाज वापरले जात असल्याची माहिती एलएसइजी या सागरी व्यापाराशी संबंधित डेटा विश्लेषण संकेतस्थळाने दिली आहे. ज्या डुकम बंदराजवळ ही दुर्घटना घडली ते ओमानच्या नैऋत्य दिशेला आहे. ओमानच्या तेल आणि वायू खाण प्रकल्पांचे ते प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी तेलशुद्धीकरणाचे मोठ-मोठे प्रकल्प असल्यामुळे ओमानच्या औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे.