जर्मनीत चार दिवसांचा आठवडा
बर्लिन : सध्या कित्येक देशांमध्ये कामाचा आठवडा चार दिवसांचा करण्याचा ट्रेंड चालू आहे. आता जर्मनीमध्ये (Germany) देखील कर्मचाऱ्यांना तीन दिवस सुट्टी देण्याचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. देशातील ४५ कंपन्यांनी हा प्रयोग राबवण्याची तयारी दर्शवली असून, १ फेब्रुवारी २०२४ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. (4-day work wee)
ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पूर्वी आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळत होती. मात्र, आता त्यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही जादाची सुट्टीदेखील पगारी असणार आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार आणि जादा सुट्टी मिळणार आहे. सध्या जर्मनीमध्ये कंपन्यांना एका मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी आलेल्या आर्थिक मंदीमुळे तेथील अर्थव्यवस्था आता हळू-हळू पूर्वपदावर येत आहे.
मात्र यामुळे कित्येक कंपन्यांमध्ये कामगार उपलब्ध नसल्याचे म्हटले जात आहे. चार दिवसांच्या वर्किंग वीकमुळे कामगारांची कमी भरून निघणार आहे. सोबतच उपलब्ध कामगारांच्या कार्यक्षमतेत देखील वाढ होईल, असा विश्वास या कंपन्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी २०२२ साली ब्रिटनमध्ये देखील अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. यानंतर कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढल्याचे दिसून आले होते. जगभरातील कित्येक कर्मचारी संघटना या कामगारांवरील कामाचा ताण आणि दबाव कमी करण्याची मागणी करत असतात. यामुळेच अशा प्रकारचे प्रयोग अधिक प्रमाणात होण्याची मागणी केली जात आहे.