निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांना मोठा झटका
पाकिस्तान (Pakistan) सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच, पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानी न्यायालयाने गोपनीय बाबी उघड केल्याप्रकरणी इम्रान खान यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) ही माहिती दिली.
पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांच्याव्यतिरिक्त, माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही 'सायफर' प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण सार्वजनिक गोपनीय दस्तऐवज आणि गोपनीय राजनयिक पत्रे बनवण्याशी संबंधित आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
दरम्यान, इम्रान खान यांनी २७ मार्च २०२२ रोजी एका रॅलीत काही कागदपत्रे दाखवत दावा केला होता की, हा त्यांचे सरकार पाडण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय षड्यंत्र' रचल्याचा पुरावा आहे. इम्रान खान आणि कुरेशी यांनी या कागदपत्रांचा वापर राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना आरोपी बनवण्यात आले होते. मात्र, दोघांनीही स्वत:ला निर्दोष घोषित केले होते.
रावळपिंडीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी हा निकाल दिला. खान यांचा पक्ष पीटीआयने या घडामोडी घडल्याचे मान्य केले आहे. हा प्रकार इम्रान खान आणि त्यांचा राजकीय लढा कमकुवत करण्यासाठीच या खोट्या प्रकरणावर चर्चा करण्यात येत असल्याचा दावाही पीटीआयने केला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमे आणि जनतेला या सुनावणीपासून दूर ठेवण्यात आले आहे. आमची कायदेशीर टीम या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. न्यायालयाकडून घाईघाईने हा निर्णय घेण्यात आला. अशा स्थितीत वरील वस्तुस्थिती लक्षात घेता शिक्षेला स्थगिती मिळणे अपेक्षित असल्याचेही पीटीआयचे म्हणणे आहे.
पक्षावर बंदी येण्याची शक्यता
पाकिस्तानी माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार इम्रान खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा पक्ष 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफवर (पीटीआय) बंदी घातली जाऊ शकते. सध्या प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये पीटीआयचे संस्थापक आणि इतर नेत्यांचा निकाल आल्यानंतर पीटीआयवर बंदी घालणे शक्य होईल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या निधीबाबत अनेक वर्षांच्या चौकशीनंतर, ऑगस्ट २००३ मध्ये पक्षाला 'बेकायदेशीर निधी' मिळाल्याची घोषणा केली. तसेच, ९ मे २०२३ रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी खान यांना अटक केल्यानंतर इस्लामाबादमध्ये हिंसक निदर्शने झाली. खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयासह २० हून अधिक लष्करी कार्यालयांना आग लावण्यात आली. ९ मे रोजी समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर पक्ष अडचणीत आला होता. हल्ल्यानंतरच्या काही दिवसांत शेकडो दंगलखोरांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर विविध आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीच्या दिवशी निवडणूक होणार आहे. त्याआधी माजी पंतप्रधान नवाज शरीफ पाकिस्तानला परतले आहेत. त्यांनी २०१९ मध्ये पाकिस्तान सोडले होते आणि ते ब्रिटनला राहिले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला त्यानंतर नवाज शरीफ पाकिस्तानला परतले आहेत. आता निवडणुकांसाठी अवघे नऊ दिवस उरलेले असताना इम्रान खान यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.