संग्रहित छायाचित्र
जीनिव्हा : सध्या भारत-चीन सीमेवरील पूर्व लडाख भागामध्ये घुसखोरी केलेल्या चीनचे ७५ टक्के सैन्य माघारी गेले असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे दिली. जीनिव्हामध्ये आयोजित एका मुलाखतीत त्यांनी चीनबरोबर सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली.
जयशंकर म्हणाले की, गलवान खोऱ्यामध्ये जून २०२० मध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम झाला होता. सीमेवर हिंसा होत असेल तर द्विपक्षीय संबंधांवरही परिमाम होणे साहजिक आहे. त्याप्रमाणे भारत-चीन संबंधही ताणले गेले होते. उभय देशांतील तणावाच्या स्थितीवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. साधारणपणे ७५ टक्के सैन्य माघारीचा प्रश्न निकाली निघालेला आहे. याबाबत आणखी काही गोष्टी सुधारणा होणे बाकी आहे. सीमावादावर तोडगा निघाला तर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारतील असेही जयशंकर यांनी यावेळी सूचित केले.
भारत-चीन संबंध गुंतागुंतीचे असल्याचे मान्य करतानाच १९८८ मध्ये उभय देशांतील संबंध चांगले असताना अनेक मुद्द्यांवर सहमती झालेली होती असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लडाख सीमेवरून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सर्व सैन्य माघारी घेण्यासाठी सहमती झाल्याची माहिती देण्यात आली. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची सेंट पीटर्सबर्ग येथे भेट घेतली. त्यावेळी सैन्य माघारीसाठी तातडीने आणि दुप्पट प्रयत्न करण्यावर सहमती झाली. चीनच्या आक्रमणामुळे लडाख सीमेवर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला हा मुद्दा हाताळावाच लागेल, असेही मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.