मालदीवची ३६ बेटे चीनच्या ताब्यात!

चिनी कंपन्या १२ हजार कोटी खर्चून बेटांचा पर्यटनासाठी विकास करणार : अध्यक्ष मुईज्जूंचे भारतविरोधी धोरण

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Tue, 12 Mar 2024
  • 12:15 pm
36islandsofMaldivesunderChina'scontrol!

मालदीवची ३६ बेटे चीनच्या ताब्यात!

#माले 

मालदीवचे चीनधार्जिणे अध्यक्ष मोहम्मद मुईज्जू अधिकच चीनच्या कह्यात जात आहेत. भारतविरोधी भूमिकेच्या आधारावर सत्ता काबिज केल्यावर चीनला अनुकूल असणारे त्यांचे धोरण भारताला त्रासाचे ठरत आहे. यामुळे मालदीवमधील चीनचा प्रभाव वाढत आहे. आता मुईज्जू यांनी देशाच्या १८७ वस्ती असलेल्या बेटांपैकी ३६ बेटे चिनी पर्यटन कंपन्यांना भाड्याने दिली आहेत. चिनी कंपन्या १२ हजार कोटी रुपये खर्चून बेटांचा पर्यटनासाठी विकास करणार आहेत. मालदीवने अलीकडेच अनेक बेटांवर विकास प्रकल्प सुरू केले आहेत. सत्तेवर आल्यानंतरच्या आपल्या पहिल्या चीन दौऱ्यात  मुईज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले होते.

सध्याच्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत ४ लाख चिनी पर्यटक मालदीवला भेट देऊन गेलेले आहेत. मालदीव आणि चीन यांच्यात जानेवारी २०२४ मध्ये रसमलेमध्ये ३० हजार सदनिका बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. चीनधार्जिण्या मुईज्जूमुळे भारतासोबतचे मालदीवचे संबंध तणावाचे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मालदीवने पहिल्यांदाच तुर्कीकडून लष्करी ड्रोन खरेदी केले आहेत. सागरी सीमेचे रक्षण करण्यासाठी याचा वापर होणार आहे. मालदीवमधील माध्यमांच्या वृत्तानुसार हे ड्रोन  मार्च रोजी देशात दाखल झाले आहेत. हे ड्रोन सध्या नुनू माफारू आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. मालदीव सरकारने ड्रोन खरेदी कराराबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मुईज्जू सरकारने ड्रोन खरेदीसाठी अंदाजपत्रकात ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केली आहे. मालदीव संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार रस्ते, समुद्र आणि हवाई मार्गाने देशाचे संरक्षण करण्यासाठी लष्कराला सज्ज करण्यासाठी सरकार आधुनिक उपकरणे खरेदी करत आहे.

यापूर्वी ४ मार्च रोजी अध्यक्ष मुईज्जू यांनी अशी घोषणा केली होती की, देशाच्या रक्षणासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (सागरी मर्यादा) ची सतत देखरेख ठेवली जाईल. यामुळे देशाचे संरक्षण करता येईल. याच्या दोन दिवस अगोदर मालदीवने चीनसोबत संरक्षण करार केला होता. त्याचा भाग म्हणून मालदीवला चीनकडून मोफत लष्करी साहित्य आणि लष्करी प्रशिक्षण मिळणार आहे. जानेवारीतील चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर मुईज्जू यांनी वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशाच्या सुरक्षेबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, आमचा देश छोटा आहे, पण याचा अर्थ असा नाही की, आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाला मिळाला आहे. हिंद महासागर कोणत्याही एका देशाचा नाही. मालदीव हा महासागराचा सर्वात मोठा भाग असलेल्या देशांपैकी एक आहे. आमच्याकडे समुद्रात छोटी बेटे आहेत. आम्ही ९ लाख चौरस किलोमीटरचा एक मोठा भाग आर्थिक क्षेत्र म्हणून राखून ठेवला आहे. मालदीवचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण नेहमी मालदीवच्या पाठीशी असू अशी भूमिका चीनने घेतली होती. 

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest