पाकच्या ‘इस्लामफोबिया’ प्रस्तावावर भारत मतदानापासून दूर
न्यूयॉर्क: ‘द्वेष मग तो इस्लाम धर्माचा असो किंवा हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध धर्माचा असो, आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो. केवळ इस्लामद्वेषावर बोलणे योग्य नाही. सर्व प्रकारचे धार्मिक धोके आपण ओळखायला हवेत, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात फटकारले आहे. सारे जग प्रगती करीत असताना त्यात खीळ घालण्याचे काम करणारा देश, म्हणून पाकिस्तान कुख्यात आहे, अशी टीका संयुक्त राष्ट्रातील (यूएन) भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी शुक्रवारी केली.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या ७८ व्या सत्रात ‘इस्लाम फोबियावरील उपाय’ यावर चर्चा झाली. यात पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत मुनीर अक्रम यांनी अयोध्येतील राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केल्याचा मुद्दा उपस्थित केला. रुचिरा कंबोज यांनी त्याला जोरदार उत्तर देत पाकिस्तानला आरसा दाखविला. ‘‘कोणताही धर्म अथवा श्रद्धेबद्दलचा द्वेष, हा केवळ इस्लामबाबत नसून अन्य धर्माचे लोकही यात भरडले जात आहेत. भारत सर्व प्रकारच्या धार्मिक द्वेषांविरोधात आहे. तो ज्यूंविरोधात असो की ख्रिस्ती धर्माविरोधात अथवा इस्लामविरोधातील द्वेष, आम्ही त्याचा निषेध करतो, असे त्या म्हणाल्या.
इस्लामफोबियावरील उपाय विषयावरील प्रस्ताव पाकिस्तानने बैठकीत मांडला. आमसभेने ११५ मतांनी तो स्वीकारला. प्रस्तावाच्या बाजूने ११५ देशांनी मतदान केले. भारताने कोणीही विरोधात किंवा बाजूने मतदान केले नाही. भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इटली, युक्रेन आणि ब्रिटन यांच्यासह ४४ देशांनी मतदानात भाग घेतला नाही.
इस्लामद्वेषावरील उपायांवरील प्रस्तावावर भारताची भूमिका स्पष्ट करताना कंबोज म्हणाल्या की, आज आपण जगात भू-राजनैतिक तणाव आणि असमतोल विकासाचा सामना करीत आहोत. याचा परिणाम म्हणजे असहिष्णुता, भेदभाव आणि धर्माच्या नावाखालील हिंसाचारात झालेली वाढ. ही वाढ चिंताजनक आहे. विविध धर्मांचा समावेश करणारा बहुलतावादी आणि लोकशाहीवादी देश असा समृद्ध इतिहास असलेला भारत दीर्घकाळापासून अत्याचार सहन करीत असलेल्या लोकांसाठी आश्रयस्थान बनलेला आहे. सर्वधर्मसमभावावर प्रकाश टाकताना कंबोज यांनी भारतात सर्व धर्मीयांना भेदभावमुक्त वातावरण मिळालेले असल्याचे आवर्जून सांगितले.