संग्रहित छायाचित्र
टोकियो: एखाद्या कात्रीमुळे एवढा गोंधळ होऊ शकतो का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीत शंभर टक्के तथ्य आहे. जपानमध्ये एका कात्रीमुळे तब्बल ३६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तर दोनशेहून अधिक विमाने उशिराने धावली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून अनेक प्रवाशांना माघारी फिरावे लागले आहे.
हे सगळे जपानमधील सर्वात मोठ्या, सर्वात व्यस्त अशा न्यू चिटोस विमानतळावर घडले आहे. या सर्वासाठी निमित्त ठरलीय फक्त एक कात्री. या घटनेची चर्चा जपानच नाही तर संपूर्ण जगभरात सुरू आहे. झाले असे की, न्यू चिटोस विमानतळामधील एका रिटेल शॉपमधून एक कात्री गायब झाली होती. ज्यानंतर विमानतळ प्रशासनाने हे प्रकरण सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानत तातडीने तपास सुरू केला. या घटनेनंतर विमानतळावरील वाहतूक थांबवण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमानतळाची शोधमोहीम सुरू केली. यावेळी विमानतळावरील सर्व प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली. ज्यामुळे विमानतळावर मोठी गर्दी जमा झाली.
विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवाशांना विमानतळावरून माघारी फिरावे लागले. ज्या प्रवाशांनी विमान प्रवास केला, त्यांचा देखील मोठा खोळंबा झाला. सोशल मीडियावर प्रवाशांनी झालेल्या मनस्तापाबद्दल संताप व्यक्त केला. शोधमोहिमेनंतर संबंधित कात्री त्याच दुकानात आढळली. मात्र सुरक्षा यंत्रणांनी प्रकरणाची गांभीर्याने घेतलेली दखल लक्षात घेत सापडलेली कात्री तीच आहे का हे देखील तपासून पाहिले आहे. ही घटना विमान हायजॅक आणि दहशतवादी हल्ला या दोन्ही दृष्टीने पाहिली गेली. ज्यामुळे यंत्रणांनी वेळ घेऊन सविस्तर तपास केला.
कात्री सापडल्याची घोषणाही प्रशासनाने उशिरा केली. परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने विमानतळ प्रशासनाला ही घटना पुन्हा घडू नये, यासाठी चौकशी करण्यास सांगितले. विमानतळ प्रशासनाने एका निवेदनात म्हटले की, स्टोअरमधील चुकीच्या व्यवस्थापनामुळे ही घटना घडली आहे. आम्हाला भीती होती की ही अपहरण किंवा दहशतवादाशी संबंधित समस्या असू शकते. पुन्हा एकदा आम्ही व्यवस्थापन सुधारण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू.